बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी कोट्यावधींचा खर्च
By Admin | Updated: November 28, 2014 17:29 IST2014-11-28T17:29:55+5:302014-11-28T17:29:55+5:30
हत्याकांडातील आरोपी असलेले स्वयंघोषीत संत बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी हरियाणा आणि पंजाब सरकारच्या तिजोरीतील तब्बल २६ कोटी रुपये खर्ची पडल्याची माहिती उघड झाली आहे.

बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी कोट्यावधींचा खर्च
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २८ - हत्याकांडातील आरोपी असलेले स्वयंघोषित संत बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी हरियाणा आणि पंजाब सरकारच्या तिजोरीतील तब्बल २६ कोटी रुपये खर्ची पडल्याची माहिती उघड झाली आहे. हरियाणा पोलिसांना हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात हा उल्लेख करण्यात आला आहे.
स्वयंघोषित संत बाबा रामपाल यांना २००६ मधील हत्याप्रकरणात हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दोन आठवड्यांचे अथक प्रयत्न व हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना रामपाल यांना अटक करण्यात यश आले होते. शुक्रवारी रामपाल यांना कडेकोट बंदोबस्तात हायकोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी अटकेसाठी आलेल्या खर्चाचा सखोल तपशील कोर्टासमोर सादर केला. यामध्ये रामपाल यांचा ठावठिकाणा शोधणे व त्यांच्या अटकेसाठी हरियाणाने १५ कोटी ४३ लाख, पंजाबने ४ कोटी ३४ लाख, चंदीगड प्रशासनाने ३ कोटी २९ लाख आणि केंद्र सरकारने ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले. या स्वयंघोषित संताच्या अटकेसाठी ऐवढा खर्च झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोर्टाने रामपाल यांच्या संपत्तीचा तपशील, या अटकसत्रात जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय अहवालाचा तपशीलही सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे.