EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 02:07 PM2020-03-27T14:07:21+5:302020-03-27T14:43:49+5:30

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात.

CoronaVirus: RBI moratorium of 3 months on EMI means what? Know the answers hrb | EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

EMI ला तीन महिन्यांचा दिलासा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने लोकही घरातच बंदिस्त झालेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता साऱ्याचा उद्योगधंद्यांना टाळे लागले आहे. यामुळे अनेकांचा रोजगारही बुडालेला आहे. तर या परिस्थितीचा फायदा घेणारेही बरेच आहेत. अन्न धान्याच्या व इतर वस्तूंच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढवून लुटालूट सुरु झालेली आहे. यामुळे नोकरदार, व्यावसायिकांना आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे. 


आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज गृह, वाहन कर्जासह अन्य कर्जांचे EMI तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याची परवानगी बँकांना दिली आहे. या सूचनेनुसार खासगी, सरकारी बँका, बिगर बँकिंग वित्तिय संस्था निर्णय घेऊ शकतात. तसेच गृह कर्ज देणाऱ्या फायनान्स कंपन्याही ग्राहकांना दिलासा देऊ शकणार आहेत. ही सूचना लागू करणे बँकांवर अवलंबून असणार आहे.


तुमचा ईएमआय चुकला तर ज्या बँकेतून ईएमआय वजा होतो ती बँक आणि ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे ती बँक दोघेही दंड आकारतात. तसेच सिबिल स्कोअरही झटकन खाली येतो. हप्ता एकदा जरी चुकला तरीही याचा मोठा फटका बसतो. मात्र, तीन महिने बँकांनी ईएमआय कापू नये, असं रिझर्व्ह बँकेनं सुचवलं आहे. त्यावर निर्णयाचा अधिकार बँकांना दिला आहे. मग याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न पडला असेलच ना. चला पाहुया काय काय होणार आहे. 


आरबीआयचा निर्णय ३१ मार्चपासून लागू होणार आहे. यामुळे या दिवसापासून ज्यांचे ईएमआय जातात त्यांना दिलासा मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीने होम लोन किंवा पर्सनल लोन घेतले असेल आणि त्याची तीन महिने ईएमआय देण्याची परिस्थिती नसेल तर त्याला कोणताही दंड आकारला जाणारा नाही. आरबीआयने याची व्यवस्था या निर्णयातून केलेली आहे. आरबीआयने तशी विनंती बँकांना केली आहे. 


सिबिल स्कोअरवर काय फरक पडेल?
या तीन महिन्यांत एकही हप्ता न गेल्याने याचा परिणाम सिबिल स्कोअरवर होणार नाही. तसे आदेश आरबीआयने दिले आहेत. तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा हप्ता सुरु होणार आहे. 


बुडालेला हप्ता कधी द्यावा लागणार? 
तीन महिने हप्ता द्यावा लागणार नाही, याचा अर्थ असा नाही की ते पैसे माफ झाले. तर बँका तुमच्या लोनचे रिस्टक्चरिंग करणार आहेत. म्हणजेच जर तुमचे पाच वर्षांचे लोन असेल तर तुमच्या लोनचा कालावधी तीन महिन्यांनी वाढणार आहे. म्हणजेच पाच वर्षे तीन महिने असा कालवधी होणार आहे. तसेच जर तुम्हाला हप्त्यामध्ये वाढ करून बुडालेला हप्ता फेडायचा असेल तर तोही पर्याय बँका देऊ शकतात. 

क्रेडिट कार्डधारकांसाठी काय? 
क्रेडिट कार्ड हे मुदत कर्ज नाही. ते ग्राहकांच्या खरेदीचे बिल आहे. आरबीआयच्या घोषणेत त्याचा समावेश नाहीय. जर एखाद्याने मोठी खरेदी केलेली असेल आणि ते बिल त्याने ईएमआयमध्ये रुपांतरीत केली असेल तर कदाचित नवी घोषणा लागू होऊ शकते. पण त्यासाठी आरबीआयला वेगळे स्पष्टीकरण द्यावे लागेल. 


ईएमआय स्थगितीचा तोटाही...
तीन महिन्यांचा दिलासा मिळालेला आहे. ईएमआय माफ करण्यात आलेला नाही. यामुळे कर्जाचा अवधी वाढणार आहे. या थकलेल्या ईएमआयचे तीन महिन्यांचे अतिरिक्त व्याज द्यावे लागणार आहे. एकीकडे दिलासा असताना त्याचा भारही खिशातून उचलावा लागणार आहे. नवभारत टाईम्सने ही माहिती दिली आहे.

Web Title: CoronaVirus: RBI moratorium of 3 months on EMI means what? Know the answers hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.