लखनऊ: देशातील सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य असूनही उत्तर प्रदेशातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय नियंत्रणात असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांमधील राज्यांचा विचार केल्यास उत्तर प्रदेश पहिल्या पाच राज्यांमध्येही येत नाही. मात्र उत्तर प्रदेश सरकार देत असलेला खोटा आहे की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनीच दिलेल्या आकडेवारीत अडकले आहेत. मुंबईहून परतलेले ७५ टक्के, तर दिल्लीहून परतलेले ५० टक्के मजूर कोरोनाबाधित असल्याचं विधान योगींनी केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार कोरोनाबाधितांची आकडेवारी लपवतंय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबई, दिल्लीहून परतलेल्या अनेक मजुरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इतर राज्यांमधून परतलेल्या मजुरांमधील २५ ते ३० टक्के जण कोरोनाबाधित असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. आदित्यनाथ यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा विचार केल्यास उत्तर प्रदेश सरकार प्रसिद्ध करत असलेल्या रुग्णांच्या संख्येवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रमुख आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा अतिशय कमी आहे. सरकारचे प्रमुख आरोग्य सचिव अमित सोहन प्रसाद यांनी आज राज्यातील कोरोना रुग्णांची माहिती दिली. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ३५२ असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, दिल्लीसह इतर राज्यांमधून लाखो मजूर उत्तर प्रदेशात परतले आहेत. मुंबईतून परतलेल्या ७५ टक्के, दिल्लीतून परतलेल्या ५० टक्के, तर इतर राज्यांमधून परतलेल्या २५ ते ३० टक्के मजुरांना कोरोनाची लागण झाल्याचं खुद्द योगी आदित्यनाथ सांगत आहेत. असं असताना प्रशासनाकडून दिला जाणारा आकडा इतका कमी कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Coronavirus News: उत्तर प्रदेशात कोरोनाचे तब्बल १० लाख रुग्ण?; स्वत:च दिलेल्या आकडेवारीमुळे फसले योगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 23:04 IST