CoronaVirus News : प. बंगालमध्ये कोरोना 'कम्युनिटी ट्रान्समिशन'च्या स्तरावर, ममता बॅनर्जींची कबुली
By Ravalnath.patil | Updated: October 4, 2020 11:41 IST2020-10-04T11:36:11+5:302020-10-04T11:41:21+5:30
CoronaVirus News: दुर्गापूजनापूर्वी ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढी काळजी व सुरक्षा घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

CoronaVirus News : प. बंगालमध्ये कोरोना 'कम्युनिटी ट्रान्समिशन'च्या स्तरावर, ममता बॅनर्जींची कबुली
कोलकाता : राज्यात कोरोना व्हायरस कम्युनिटी ट्रान्समिशन स्तरावर पोहोचला आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसात दुर्गापूजनाचा उत्सव सुरू होणार आहे, यापूर्वी ममता बॅनर्जीची कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती दिली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात आहोत. आमच्या तीन आमदारांचे कोरोनामुळे निधन झाले. देशात किती लोकांचा मृत्यू झाला, याबाबत माहिती नाही. मात्र, राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन होत आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. कोलकातामध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेविरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चात सहभागी होणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मास्क लावले नव्हते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी कोरोनाबाबत भाष्य करत राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचे म्हटले आहे.
याचबरोबर, दुर्गापूजनापूर्वी ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. एवढी काळजी व सुरक्षा घेऊन सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. याशिवाय, भाजपावर निशाणा साधत ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोरोनामुळे आम्ही गेल्या काही महिन्यांत कोणतेही मोर्चे काढलेले नाहीत. केवळ भाजपा मेळावे घेत असून सतत द्वेष व कोरोना पसरवत आहे."
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत कोरोना रुग्णांची २.६६ लाख नोंद झाली आहे. शनिवारी एका दिवसांत ३३४० लोकांना कोरोनाची लागण झाली. गेल्या काही आठवड्यांमधील हा उच्चांक आहे. राज्यातील कोरोनामुळे मृतांची संख्या ५००० च्या वर गेली आहे. ३ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात ५१३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ फक्त कोलकातामधील आहेत. कोलकातामध्ये सध्या ५५९० सक्रिय रुग्ण आहेत. तर येथे १७५० लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्ण
रविवारी (४ ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५८२९ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ९४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६५ लाख ४९ हजारांवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल एक लाखांवर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.