नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2,67,52,447 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,22,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,454 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,03,720 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे.
देवी नाराज झाली, देवीचा कोप झाला असं म्हणत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केलं. सर्व नियम धाब्यावर बसवले. देवीला आनंदी करण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी एकत्र आल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. आंध्रप्रदेशच्या पूर्वेकडील गोदावरी जिल्ह्यात भक्तांनी देवीची प्रार्थना केली. देवीच्या कोपामुळे कोरोनाची दुसरी लाट आल्याचं या गावकऱ्यांचं म्हणणं असल्याने ते प्रार्थनेसाठी एकत्र जमले होते. पूर्व गोदावरी भागाचे पोलीस अधीक्षक नयीम असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, ग्रामस्थांचा हा समज आहे की देवीचा कोप झाल्याने हे सर्व घडलं आहे. म्हणूनच देवीला खूश करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं.
लोकांना देवीची प्रार्थना करताना कोरोना नियमावलीचा विसर पडला. याचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये गावातील देवीच्या मंदिराजवळ जमलेल्या या लोकांपैकी काही जणांनी मास्क लावलेला नव्हता. या घटनेबद्दल कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दी कमी केली. या प्रकरणात आयोजकांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर आपत्ती नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती नयीम असीम यांनी दिली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासनाची चिंतेत भर पडली आहे. आंध्र प्रदेशातला रुग्ण बरे होण्याचा दर 20.48 टक्क्यांवर पोहोचला आहे.
धक्कादायक! लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी गेलेल्या पथकावर गावकऱ्यांचा हल्ला
लसीकरणाबाबत जनजागृती करणाऱ्या पथकावर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनजवळील मालीखेडी गावामध्ये कोरोना लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी एक आरोग्य पथक पोहचलं होतं. मात्र गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोरोना लस घेण्यासाठी नकार तर दिलाच पण यासोबतच पथकाचं म्हणण ऐकून न घेता त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
उज्जैनच्या मलखेडी गावात लसीकरणासाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या पथकात तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांचादेखील समावेश होता. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच त्यांनी असा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. सोमवारी सकाळी लसीकरणासाठी आरोग्य पथक गावामध्ये दाखल झालं होतं. त्यावेळी गावकऱ्यांनी या पथकावर हल्ला केला. गावातील सहाय्यक सचिव असणाऱ्या महिलेचे पती हे या संदर्भात गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी पुढे गेले होते. गावकऱ्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.