coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Published: November 17, 2020 02:04 PM2020-11-17T14:04:12+5:302020-11-17T14:05:24+5:30

Delhi Corona News : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत.

coronavirus: Delhi in the direction of lockdown again? Arvind Kejriwal to send proposal to Center | coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

Next
ठळक मुद्देदिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे.दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेनोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने अनलॉकदरम्यान, नागरिकांना दिलेल्या अनेक सवलती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होत असल्यास गर्दी होणारे बाजार तात्पुरते बंद करण्याची परवानगी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून मागण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दिल्ली सरकारने विवाह सोहळ्यांना दिलेली सूट रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही विवाह सोहळ्यांसाठी २०० जणांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती. मात्र आता केवळ ५० लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर ही मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र आता ती मागे घेण्यात येत आहे.

दरम्यान, दिल्ली सरकार कोरोनाच्या संसर्गाबाबत केंद्र सरकारला एक प्रस्तावही पाठवणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होण्याच्या परिस्थितीत दिल्लीतील गर्दीवर्दळ असणारे बाजार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. मात्र आयसीयूची सुविधा असलेल्या बेडची संख्या कमी आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. त्यांनी सांगितले की, सर्व सरकारे मिळून काम करत आहेत. मात्र सर्वात मोठी गरज आहे ती लोकांनी काळजी घेण्याची. अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत. माझे आवाहन आहे की, कृपया मास्क वापरा. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.  

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

तर भारतामध्ये आतापर्यंत एकूण ८८ लाख ७४ हजारहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर देशात आतापर्यंत १.३० लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळ ही कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत.

 

Web Title: coronavirus: Delhi in the direction of lockdown again? Arvind Kejriwal to send proposal to Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.