CoronaVirus: कोरोनाचा हाहाकार! आठवड्याभरात मृतांच्या संख्येत चारपट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:26 IST2020-03-31T15:23:58+5:302020-03-31T15:26:20+5:30
आठवड्याभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ; महाराष्ट्र, केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

CoronaVirus: कोरोनाचा हाहाकार! आठवड्याभरात मृतांच्या संख्येत चारपट वाढ
नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढल्याचं स्पष्ट दिसत आहे. वर्ल्डोमीटरनं सकाळी ९ वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १२५१ वर पोहोचली आहे. यातील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
जगात आतापर्यंत पावणे आठ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीन, युरोपनंतर आता अमेरिकेत कोरोनानं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगानं वाढली आहे. १ मार्च रोजी देशात कोरोनाचे केवळ ३ रुग्ण होते. हे तिघेही केरळचे होते. यानंतर २ मार्चला कोरोनाचे आणखी तीन रुग्ण आढळून आले. यातील एक व्यक्ती इटलीहून दिल्लीला आली होती. दुसरी व्यक्ती दुबईहून तेलंगणाला परतली होती. तर तिसरी व्यक्ती इटलीहून राजस्थानला फिरायला आली होती. २ मार्चनंतर देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्यानं वाढू लागली.
काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२७ रुग्ण आढळले. याआधी कधीही एकाच दिवसात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले नव्हते. २३ मार्चपर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या ७ इतकी होती. तर कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा ४१५ इतका होता. ३१ मार्चपर्यंत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी १२५१ पर्यंत पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ३२ वर गेला आहे. गेल्या आठवड्याभरात कोरोना अतिशय वेगानं वाढल्याचं यातून दिसून येत आहे.