Corona Virus: अनेक राज्यांत शाळा, कॉलेज बंद; देशात रुग्णांची संख्या ८१ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 01:58 AM2020-03-14T01:58:24+5:302020-03-14T06:37:17+5:30

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, ओडिशा, हरयाणाचा समावेश

Corona Virus: Schools in many states, colleges closed; The number of patients in the country is 81 | Corona Virus: अनेक राज्यांत शाळा, कॉलेज बंद; देशात रुग्णांची संख्या ८१ वर

Corona Virus: अनेक राज्यांत शाळा, कॉलेज बंद; देशात रुग्णांची संख्या ८१ वर

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता ८१ वर पोहोचली आहे. कर्नाटकात एका ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या रुग्णांमध्ये १७ जण विदेशी आहेत. १६ जण इटलीचे नागरिक आहेत. तर, एक जण कॅनडाचा नागरिक
आहे.

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, नागरिकांनी कोरोनामुळे घाबरुन जाऊ नये. सात रुग्ण बरे झाले असून
त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. तर, ७१ रु ग्णांची प्रकृती स्थिर आहे. कलबुर्गी येथील ही व्यक्ती नुकतीच सौदी अरेबियातून आली होती. कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामलु यांनी सांगितले की, त्या व्यक्तीचे नमुने पॉझिटिव्ह आले होते. कर्नाटकात ज्या वृद्धाचा
मृत्यू झाला त्याच्या संपर्कात आलेल्या एका ४६ वर्षीय व्यक्तीला वेगळे ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीत सहा रुग्ण तर, उत्तरप्रदेशात १० रुग्ण आढळलेले आहेत. कर्नाटकात ५, महाराष्ट्रात ११ आणि लडाखमध्ये ३ जणांना संसर्ग झाला आहे. राजस्थान, तेलंगणा, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मिर, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण समोर आला आहे. केरळात आतापर्यंत १७ रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्णांना यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. बंगळुरुतील एका कंपनीतील एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाला आहे. हा कर्मचारी नुकताच ग्रीसहून परतला होता.

देशात कोरानाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, घाबरुन जाण्याचे कारण नाही. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७५ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रभावी धोरण ठरवू
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सार्क देशांनी संयुक्तपणे धोरण राबवावे. सार्क देशांनी जगासमोर उदाहरण घालून द्यावे व कोविड-१९ ला खंबीरपणे तोंड देण्यासाठी सार्क देशांच्या नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घ्यावी. सार्कचे सदस्य देश श्रीलंका, मालदीव, भूतान आणि नेपाळने या सूचनेचे स्वागत केले. आमच्या देशाच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रभावी धोरण ठरवू शकतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सरकारला गुंगी
कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मोदी सरकारने ज्या काही हालचाली केल्या त्या पाहता त्याला ‘गुंगी’ आली आहे. जर कठोर उपाययोजना केली गेली नाही तर अर्थव्यवस्था नष्ट होईल. हा आजार ‘फार मोठा प्रश्न’ असून, त्याकडे दुर्लक्ष करणे हा काही उपाय नाही.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते

पुरेशी काळजी घ्या
कोरोना व्हायरसचा फैलाव होणार नाही यासाठी लोकांनी पुरेशी काळजी घ्यावी. प्रत्येकाने पुरेसे सावध राहावे व काळजी घ्यावी. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केलेले आहे. - प्रियांका गांधी, काँग्रेस

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवणार
देशात कोरोना रुग्णांची संख्या ८१ वर पोहोचली असताना अनेक राज्य सरकारांनी आपल्या राज्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत अथवा काही आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, हरयाणा, ओडिशा या राज्यांनी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ७५ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० नागरिकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे.
 

Web Title: Corona Virus: Schools in many states, colleges closed; The number of patients in the country is 81

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.