आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल
By देवेश फडके | Updated: January 13, 2021 17:54 IST2021-01-13T17:52:24+5:302021-01-13T17:54:15+5:30
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली.

आनंदाची बातमी! कोव्हिशिल्डनंतर कोव्हॅक्सिनच्या वितरणाला सुरुवात; ११ शहरांत पहिली खेप दाखल
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम राबवली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीनंतर आज (बुधवारी) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वितरणाला सुरुवात झाली.
भारत बायोटेकची निर्मिती असलेली कोव्हॅक्सिन कोरोना लसीची पहिली खेप आज सकाळी ६.४० मिनिटांनी हैदराबादहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने पाठवण्यात आली. दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पाटणा, जयपूर, लखनऊ, सूरत, रांची, कुरुक्षेत्र, कोच्चिसह ११ शहरांमध्ये कोव्हॅक्सिनची लसीचे वितरण करण्यात आले.
एअर एशिया विमानातून कोव्हॅक्सिन लसीचे ६० हजार डोस जयपूर येथे दाखल झाले. विमानतळावरून आदर्श नगर येथे असलेल्या कोल्ड स्टोअरेजमध्ये कोरोना लस रवाना करण्यात आली. कोव्हिशिल्डची लसही जयपूर येथे पाठवली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय सूरत येथे कोरोना लसीचे ९३ हजार ४०० डोस वितरीत करण्यात आले आहेत.
रांची येथे १६ हजार २०० कोरोना लसी पोहोचल्या आहेत. तर भोपाळमध्ये कोरोना लसीचे ९४ हजार डोस पोहोचले आहेत. कर्नाल येथे ४ लाख कोरोना लसीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. तर चंदीगड येथे २० हजार ४५० कोरोना लसी पोहोचवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंबई येथेही सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस दाखल झाली आहे. मुंबईत एकूण ०१ लाख ३९ हजार ५०० लस आल्या आहेत. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनसह आणखी दोन लसींना केंद्र सरकार मंजुरी देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.