नेहरू वनोद्यानाच्या हस्तांतरणास तत्त्वत: मान्यता वनमंत्र्यांसमवेत बैठक : त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
By Admin | Updated: January 6, 2015 00:16 IST2015-01-05T22:04:18+5:302015-01-06T00:16:13+5:30
नाशिक : पाथर्डी शिवारातील पांडवलेणीलगत असलेल्या वन विभागाचे नेहरू वनोद्यान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वनमंत्र्यांनी सदर निर्णय घेत त्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याबाबतचा प्रस्ताव दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले.

नेहरू वनोद्यानाच्या हस्तांतरणास तत्त्वत: मान्यता वनमंत्र्यांसमवेत बैठक : त्रिपक्षीय करार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
नाशिक : पाथर्डी शिवारातील पांडवलेणीलगत असलेल्या वन विभागाचे नेहरू वनोद्यान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्त्वत: मान्यता दिली. मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वनमंत्र्यांनी सदर निर्णय घेत त्यासाठी त्रिपक्षीय करार करण्याबाबतचा प्रस्ताव दहा दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले.
मुंबईतील साद्री अतिथीगृहात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक झाली. बैठकीत पाथर्डी शिवारातील पांडवलेणीलगत असलेले वन विभागाचे नेहरू वनोद्यान पालिकेकडे हस्तांतरित करून ते नागरिकांसाठी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला गार्डन सिटी बनविण्याचा ध्यास घेतला असून, त्याअंतर्गतच वन विभागाच्या नेहरू वनोद्यानातही पर्यटनस्थळ विकसित करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यासाठी राज ठाकरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. सदर वनोद्यान पर्यटनस्थळ म्हणून विकसित करताना तेथील वृक्ष प्रजातीस कोठलीही इजा पोहोचविली जाणार नाही, तसेच वृक्षलागवड व त्यांचे संगोपन केले जाईल. याशिवाय वनोद्यानात मंच, निरीक्षण मनोरे, बसण्यासाठी बेंचेस, पॅगोडा, प्रसाधनगृह, चहा-कॉफीसाठी स्टॉल तसेच जॉगिंग ट्रॅक, बांबूच्या माध्यमातून सुशोभिकरण आदि सुविधाही उभारल्या जाणार आहेत. भविष्यात अतिक्रमणाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सदरचा परिसर नयनरम्य करणे, परिसरात रोप वे, पेरीफेरीयल वॉक वे विकसित करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी चर्चेअंती वनमंत्री मुनगंटीवार यांनी सदर कामाबाबत बजेटमध्ये तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नाशिक महापालिकेचे अधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांना दिला. तसेच वन विभागातील अधिकार्यांनी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना सोबत घेऊन महापालिकेसमवेत चर्चा करावी आणि विकसन व देखभालीसंबंधी त्रिपक्षीय करार करण्याबाबतचा प्रस्ताव येत्या दहा दिवसांत सादर करावा, असेही आदेशित केले.
बैठकीला महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार अपूर्व हिरे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले, वन विभागाचे सचिव तिवारी, महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते.