स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वादंग
By Admin | Updated: May 29, 2014 02:49 IST2014-05-29T02:49:50+5:302014-05-29T02:49:50+5:30
शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची काँग्रेसने कोंडी केली आहे. देशाच्या शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण किती,

स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वादंग
नवी दिल्ली : शैक्षणिक पात्रतेवरून मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची काँग्रेसने कोंडी केली आहे. देशाच्या शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण किती, यावरुन निर्माण झालेला वाद बुधवारी चिघळला. भाजपा आणि काही मंत्र्यांनी या मुद्यांवरून थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रतिहल्ला केल्यानंतर काँग्रेसने आक्रमक होत इराणींनी पूर्वी उमेदवारी अर्जात दिलेल्या विसंगत माहितीच्या बळावर त्यांची चांगलीच कोंडी केली. जदयू नेते शरद यादव यांनी हा मुद्दा उकरून काढल्याबद्दल काँग्रेसवर हल्लाबोल करीत इराणी यांना पाठिंबा दिला. पण यासंदर्भात स्वत: इराणी यांनी टिप्पणी करण्यास नकार दिला. पण खुद्द भाजपातही स्मृती यांना दिलेल्या जबाबदारीवरून नाराजी आहे. काही नेत्यांनी त्याकडे पक्षाध्यक्ष राजनाथ यांचे लक्षही वेधले आहे. पण उघडपणे बोलण्यास कोणी तयार नाही. महिला हक्क कार्यकर्त्या मधु किश्वर यांनी हे प्रकरण सुरू केले. इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्री केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी टिष्ट्वटवरून टीका केली. भारतातील शिक्षण आणि संशोधनाची फारच वाईट अवस्था आहे. त्याचा दर्जा उंचावण्यासाठी तातडीने काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी दूरदृष्टी असलेला नेता हवा आहे, असे मोदी यांचे समर्थक मानल्या जाणार्या किश्वर म्हणाल्या. मनुष्यबळ विकास मंत्रालय मुख्यमंत्र्याकडे असले पाहिजे. कारण शिक्षण हा राज्याचा विषय आहे. तसेच हे विभाग हातळण्यासाठी कुलगुरूंची आवश्यकता आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेस नेते अजय माकन यांनी मंगळवारी इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून टोमणा मारला होता. त्यावरून बुधवारी भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला करीत सोनिया गांधींना लक्ष्य केले. मात्र तिवारी यांनी आक्रमक पवित्रा न घेता, इराणींच्या वादावरून काँग्रेसच्याच माकन यांना संयमाचा सल्ला दिला आहे. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मुद्देसूद बोला, असे तिवारी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)