संविधान हाच सर्वांत मोठा धर्म; सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 08:14 IST2024-12-15T08:13:25+5:302024-12-15T08:14:30+5:30
राज्यघटनेची शक्ती कमी न करण्याचे आवाहन.

संविधान हाच सर्वांत मोठा धर्म; सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभेत संविधानावरील शनिवारी चर्चेच्या दुसरा दिवशीही विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनीची भाषणे झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या टीकेला सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी सडेतोड उत्तरे दिली. जनतेमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न केले जाऊ नयेत, असा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी आळवला, तर संविधानविरोधी हा विरोधकांचा आरोप दांभिकपणा असल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली.
सरकार संविधानाची शक्ती कमी करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार सुखदेव भगत यांनी केला. ते म्हणाले, पंडित नेहरू, तसेच काँग्रेसने संविधानाची मुळे इतकी खोल रुजविली होती की आज एक चहावाला पंतप्रधानपदावर विराजमान आहे.
... तुम्ही शिखांचे गळे कापले : श्रीकांत शिंदे
तुम्ही तर १९८४च्या दंगलीत शिखांचे गळे कापले होते, अशा शब्दांत शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. १९६४ मध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात १०७० जातीय दंगली झाल्याचे सांगून यांच्या काळात कारसेवकांना गोळ्या झाडल्याचे शिंदे म्हणाले.
किती पानांचे हे माहिती आहे? : अनुराग ठाकूर
राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर प्रचंड आक्रमक झाले. राहुल गांधी संविधान खिशात घेऊन फिरतात; परंतु यात किती पाने आहेत, हे त्यांना माहिती नसेल. या वक्तव्यावर सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवून त्यांना साथ दिली.
राहुल यांनी शिक्षक बदलावा : प्रसाद
चर्चेदरम्यान सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी कठोर टीका केली. राहुल यांचा 'शिक्षक' बदलण्याची गरज असल्याचे सांगून सावरकर ज्या अंदमान-निकोबारच्या तुरुंगात कैद होते. तेथे राहुल यांना घेऊन जाण्याची गरज आहे, असे म्हणाले.
आता तेच दांभिक रूप घेताहेत : तेजस्वी सूर्या
संविधानावर हल्ला करणारेच आता दांभिक रूप घेत आपण यातील तज्ज्ञ असल्याचे भासवत आहेत. वर्षानुवर्षे हे असेच सुरू आहे, अशी टीका भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली.
स्वतंत्र देशात संविधान हाच धर्म : सैलजा
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कुमारी सैलजा यांनी केला. भारताला आता 'प्रेमाच्या दुकानाची गरज असल्याचे सांगून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीका त्यांनी केली. सर्वांची धार्मिक पुस्तके आहेत; परंतु स्वतंत्र देशासाठी संविधान हाच मोठा धर्म असतो, असे त्या म्हणाल्या.