दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये वाक्युद्ध
By Admin | Updated: February 13, 2015 01:12 IST2015-02-13T01:12:30+5:302015-02-13T01:12:30+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसमध्ये आज गुरुवारी जाहीर वाक्युद्धाला सुरुवात झाली़ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित

दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये वाक्युद्ध
नबीन सिन्हा, नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसमध्ये आज गुरुवारी जाहीर वाक्युद्धाला सुरुवात झाली़ काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्ली निवडणुकीत पक्षाचे चेहरे राहिलेले अजय माकन यांच्यावर तोंडसुख घेऊन, या वाक्युद्धाला तोंड फोडले़ ज्येष्ठ नेत्यांकडूनच पक्षाचे जाहीर वाभाडे काढले जात असल्याचे पाहून, अखेर काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांना यात मध्यस्थी करावी लागली़ निवडणूक निकालांबाबत जाहीर चर्चा टाळा, अशी तंबीच त्यांनी दिली़
अजय माकन यांची मला कीव करावीशी वाटते, अशा शब्दांत शीला दीक्षित यांनी पराभवाचे संपूर्ण खापर त्यांच्या माथी फोडले़ पाठोपाठ काँग्रेस नेते पी़सी़ चाको, दिल्लीचे काँग्रेस अध्यक्ष अरविंदरसिंग लव्हली आदी माकन यांचा बचाव करताना मैदानात उतरले़ खुद्द माकन यांनी दीक्षितांच्या टीकेने दुखावल्याने पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली़ पक्षाचे असे जाहीर वाभाडे काढले जात असल्याचे पाहून, सोनिया गांधी यांना अखेर आपल्या ‘बोलघेवड्या’ नेत्यांना तंबी द्यावी लागली़ संध्याकाळी चाको आणि लव्हली सोनिया यांना भेटायला गेले असताना त्यांनी स्पष्ट शब्दांत पक्षनेत्यांना तंबी दिली़ सोनिया गांधींना भेटून बाहेर आल्यानंतर खुद्द चाको यांनी ही माहिती दिली़ ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे परस्परांवर दोषारोपण करणे दुर्दैवी असून त्यांनी संयम बाळगावा, जाहीर चर्वितचर्वण थांबवावे, असा संदेश माझ्या माध्यमातून सोनियांनी सर्व पक्षनेत्यांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले़