जावडेकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची जोरदार निदर्शने
By Admin | Updated: October 6, 2014 00:24 IST2014-10-06T00:24:05+5:302014-10-06T00:24:05+5:30
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जोरदार निदर्शने केली.

जावडेकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची जोरदार निदर्शने
नवी दिल्ली : विजयादशमीनिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी नागपूर येथे केलेल्या भाषणाचे दूरदर्शनवर थेट प्रेक्षपण दाखवायला भाग पाडल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जोरदार निदर्शने केली.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लव्हली यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह दूरदर्शनच्या मंडी हाऊस येथील कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी मध्य दिल्लीतील डीपीसीसीच्या कार्यालयासमोर या सर्वांना ताब्यात घेतले. रा.स्व.संघाचा भगवेकरणाचा अजेंडा प्रसारित करण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर दबाव आणला आहे. आमचा पक्ष अशी कृती खपवून घेणार नाही. जावडेकरांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही लावून धरू, असे लव्हली यांनी निदर्शनकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.
चेन्नई येथेही निदर्शने
तामिळनाडू थोविद जमात या संघटनेच्या ५०० वर कार्यकर्त्यांनी रविवारी चेन्नईतील दूरदर्शन कार्यालयासमोर निदर्शने करीत भाजपविरोधी घोषणा दिल्या.