मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण असे केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. विजय शहा यांच्या या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेसकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर, विजय शहा यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे आपल्या स्पष्टीकरणात म्हटले.
"ज्या लोकांनी आपल्या बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले, आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांच्यावर कारवाई केली", असे विजय शहा एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. विजय शहा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या कर्नल सोफिया यांच्याबद्दल वादग्रस्त करणारे भाजप नेते विजय शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी केली.
बिहार काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट केली. त्यात असे म्हटले आहे की, "भाजप सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी दहशतवाद्यांची बहीण आहे, असे वक्तव्य केले आहे. भारताची कन्या कर्नल सोफिया कुरेशी, जिचा सर्वांना अभिमान आहे, तिच्याबद्दल हे लज्जास्पद वक्तव्य करण्यात आले, तिचे वर्णन दहशतवाद्यांची बहीण म्हणून करण्यात आले. हा आपल्या बलाढ्य सैन्याचा अपमान आहे. या वक्तव्यानंतर भाजप त्यांचा राजीरामा स्वीकारेल का? पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते याबद्दल माफी मागतील का?", असाही सवाल उपस्थित करण्यात आला.
काँग्रेसच्या आरोपानंतर विजय शाह यांनी स्पष्टीकरण दिले. "आमच्या पंतप्रधानांनी आपल्या बहिणींच्या कपळ्यावरील कुंकू पुसणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. माझ्या भाषणाचा वेगळा संदर्भ घेऊ नये. आपल्या बहिणींनी पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे", असे ते म्हणाले.