छत्तीसगड स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा भाजपाला झटका
By Admin | Updated: December 31, 2015 13:12 IST2015-12-31T12:46:16+5:302015-12-31T13:12:11+5:30
छत्तीसगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने ११ पैकी ७ जागांवर विजय मिळवला असून भाजपाला अवघ्या ३ जागा जिंकता आल्याने पक्षाला चांगलाच झटका बसला आहे.

छत्तीसगड स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा भाजपाला झटका
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. ३१ - छत्तीसगडमध्ये रमणसिंग यांच्या सरकारची जादू कमी होताना दिसत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला चांगलाच झटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपाला ११ जागांपैकी अवघ्या ३ जागांवर विजय मिळवता आला असून ७ जागा जिंकत काँग्रेसने भाजपाला धोबीपछाड दिली आहे. २८ डिसेंबर रोजी ११ जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल गुरूवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर भाजपा सपशेल पराभूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आणि ७ जागा मिळवून दणदणीत विजय मिळवल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. जामुल, शिवपुर-चरचा, वैकुंठपूर, खैरागड, मारो, कोटा आणि भोपालपट्टनम या सात जागांवर काँग्रेस पक्ष विजयी झाला असून भैरवगड, नरहरपूर आणइ प्रेमनगर या तीन जांगावर भाजपाला विजय मिळाला आहे.
दरम्यान भिलाई येथे महापौर निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू असून तेथेही काँग्रेस ५ हजार मतांनी पुढे असल्याचे वृत्त आहे.
नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस व भाजपामध्ये चुरशीची लढत पहायला मिळत असून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ३ जागांवर विजय मिळवला आहे.