बिहार विधानसभेसाठी काँग्रेस-संजद जोडी पक्की
By Admin | Updated: June 2, 2015 23:31 IST2015-06-02T23:31:50+5:302015-06-02T23:31:50+5:30
काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या निवडणूक डावपेचांतर्गत संयुक्त जनता दलासोबत (संजद) रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहार विधानसभेसाठी काँग्रेस-संजद जोडी पक्की
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या निवडणूक डावपेचांतर्गत संयुक्त जनता दलासोबत (संजद) रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने आपल्या या निर्णयाची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना दिली आहे. सोबतच भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याची खरच इच्छा असल्यास राजदने काँग्रेस आणि संजदसोबत आघाडीत सहभागी व्हावे, असा सल्लाही लालूप्रसाद यांना देण्यात आला आहे.
काँग्रेसच्या या निर्णयाने राजदप्रमुख अडचणीत आले आहेत. लालूप्रसाद आणि बिहारचे मुख्यमंत्री व संजद नेते नितीशकुमार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरूआहे.
काँग्रेसने नितीशकुमार यांना बाजूला सारून राजदसोबत निवडणूक युती करावी यासाठी लालूप्रसाद यांनी जुन्या संबंधांचा हवाला देऊन काँग्रेसवर दबाव आणण्याचा भरपूर प्रयत्न केला; परंतु काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लालूंचा प्रस्ताव साफ फेटाळून नितीशकुमार यांच्यासोबत युतीचे फर्मान काढले.
राहुल यांच्या निर्णयाने लालूप्रसाद यांच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत. कारण ते एकटे निवडणूक रणसंग्रामात उडी घेण्यास तयार नाहीत. लालूंनी एकट्याने निवडणूक लढविली तर त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता आहे.