केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राहुल गांधी घाबरले आहेत" असं म्हणत निशाणा साधला. विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेतल्यानंतर आठवले यांनी "काँग्रेस सरकारच्या काळातही असं घडत होतं. आम्ही आंदोलन करायचो" असं म्हटलं आहे. ANI शी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"मला वाटतं की, राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात. म्हणूनच ते प्रत्येक निवडणुकीत पराभूत होत आहेत. जर निवडणूक आयोग त्यांना बोलावत असेल तर त्यांनी जावं. जर काही घोटाळा झाला असेल तर त्यांना तिथे जाण्याचा अधिकार आहे. पण राहुल गांधी तिथे जात नाहीत. निवडणूक आयोग तुम्हाला वारंवार येण्यास सांगत आहे. पण निवडणूक आयोगाविरुद्ध रॅली काढण्यात काही अर्थ नाही. विरोधकांकडे दुसरा कोणताही विषय नाही. म्हणूनच ते वारंवार असे चुकीचे मुद्दे उपस्थित करत आहेत."
"मतचोरीची कोणतीही घटना नाही. मतांची चोरी करणाऱ्यांना हटवण्याचं काम केलं जात आहे. ज्यांची नावं दोन, तीन ठिकाणी आहेत, त्यांची नावे काढून टाकली पाहिजेत. या ठिकाणचे नागरिक नसलेल्यांना रोखण्यासाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. हे केवळ बिहारसाठी नाही, तर ते संपूर्ण भारतासाठी आहे. ते आपल्यासाठी देखील आहे. यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. लोकशाहीत ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेत येण्याचा अधिकार आहे" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
मतचोरीच्या मुद्द्यावरुन सध्या देशातील राजकारण तापलं आहे. राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आज राहुल यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकरल्यामुळे सर्व आंदोलक खासदारांना रोखण्यात आलं. याच दरम्यान अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.