काँग्रेसला धक्का, जयंती नटराजन यांचा काँग्रेसला 'रामराम'

By Admin | Updated: January 30, 2015 17:12 IST2015-01-30T10:05:22+5:302015-01-30T17:12:55+5:30

काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री आणि नेत्या जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

Congress to push, Jayanti Natarajan's Congress 'Ram Ram' | काँग्रेसला धक्का, जयंती नटराजन यांचा काँग्रेसला 'रामराम'

काँग्रेसला धक्का, जयंती नटराजन यांचा काँग्रेसला 'रामराम'

>ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ३० - काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र अन्य पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे नटराजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नटराजन यांच्या राजीनाम्यामुळे  काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. 
नटराजन यांनी पक्षनेतृत्वाला पाठवलेले एक पत्र उघड झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. स्वत:ची बाजू मांडण्यासाठी नटराजन यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय दु:खदायक आहे, आपले कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेससोबत आहे. फाईल्स मंजुरीसाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात आपण बाहेर असताना अजय माकन यांनी आपल्याला फोन करून दिल्लीला बोलावले आणि मला मोदींविरोधात स्नूपगेटवरून टीका करण्यास सांगितले. मला वैयक्तिक टीकेपेक्षा त्यांच्या नीतींबाबत टीका करणे योग्य वाटत होते, मात्र तसे करता आले नाही, असेही त्या म्हणाल्या. माझी तामिळनाडू काँग्रेसबद्दल कोणतीच तक्रार नाही, माझी तक्रार हायकमांडबद्दल आहे. मला पक्षाध्यक्षांना भेटण्याची वेळच दिली नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नसल्याचा गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला. 
 
दरम्यान नटराजन यांचे पत्र उघड झाल्यानंतर आज मोठा गदारोळ झाला. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असताना काही उद्योजकांच्या फाईल्स मंजुर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दबाव यायचा असा गंभीर आरोप जयंती नटराजन यांनी त्यांच्या पत्रात केला होता. या दबावापुढे नमते न घेता मी काही फाईल्स रोखूनही ठेवल्या होत्या असा दावाही त्यांनी केला आहे. 
जयंती नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक पत्र पाठवले होते. हे पत्र शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या हाती लागले असून या पत्रात जयंती नटराजन यांनी पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप करुन काँग्रेसलाच गोत्यात आणले आहे. यामध्ये नटराजन यांनी पक्षातील काही नेते त्यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला. पक्षातील वरिष्ठांकडून पर्यावरण खात्यातील फाईल्स मंजुर व्हाव्यात यासाठी काही सूचना येत होत्या, या सुचना म्हणजे आमच्यासाठी आदेश असायचे अशी तक्रार त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. पक्षात माझा अपमान व मानसिक त्रास झाला, माझी बाजू मांडण्यासाठी मी तुमची आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र मला भेट मिळू शकली नाही असे त्यांनी पत्रात म्हटले होते. हे पत्र शुक्रवारी उघड झाल्यावर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. जयंती नटराजन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्या दुस-या पक्षात जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Congress to push, Jayanti Natarajan's Congress 'Ram Ram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.