नवी दिल्ली : देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवार दिनांक १0 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या २१ राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. डिझेल, पेट्रोल आणि घसरता रुपया या तिघांमध्ये सर्वात आधी शंभरी गाठण्याची जणू चढाओढ सुरू आहे. आधी चार राज्यांत विधानसभेच्या व नंतर लोकसभेची निवडणूक होणार असताना, मोदी सरकारचे अपयश जनतेपुढे मांडण्याचा विरोधकांचा या ‘बंद’च्या माध्यमातून प्रयत्न असेल.प्रस्तावित ‘बंद’ची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन म्हणाले, देशात इंधनाचे भाव दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे, अशा वेळी काँग्रेस स्वस्थ बसणार नाही. सोमवारचा ‘भारत बंद’ त्यासाठीच आहे. देशभरातील व्यापारी वर्गाने त्याला उत्स्फूर्तपणे साथ द्यावी, असे आवाहन करीत माकन म्हणाले, बंदच्या काळात कोणत्याही प्रकारची हिंसक घटना होणार नाही, बंद शांततेत पार पडेल, याची आम्ही दक्षता घेतली आहे.‘बंद’ची कारणमीमांसा देताना माकन म्हणाले, चार वर्षांत पेट्रोलवर २११.७ टक्के व डिझेलवर ४४३ टक्के एक्साईज ड्युटी वाढली आहे. मे २0१४ मधे पेट्रोलवर ९.२ रूपये व डिझेलवर ३.४६ रूपये एक्साईज कर होता आता तो अनुक्रमे १९.४८ रूपये व १५.३३ रूपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. सरकारने गेल्या चार वर्षात इंधनावरील एक्साईज ड्युटीव्दारे ११ लाख कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे इंधन भडक्याने वाढत चाललेली तमाम वस्तूंची महागाई रोखण्यासाठी पेट्रोल व डिझेलला त्वरित ‘जीएसटी’च्या कक्षेत आणावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.जनतेला उत्तर हवे आहे....डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या सुरू असलेल्या घसरणीचा उल्लेख करीत माकन म्हणाले, युपीएच्या काळात डॉलरच्या तुलनेत रूपया ६0 वर पोहोचला तेव्हा नरेंद्र मोदी म्हणायचे की, रूपया अति दक्षता विभागात दाखल झाला आहे आता रूपयाने ७२ ची सीमा पार केली तेव्हा पंतप्रधान मोदींना काय म्हणायचे आहे? डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत करण्यासाठी सरकारने काय केले, त्याचे उत्तरही जनतेला हवे आहे.राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख नेते राज्यातील विविध आंदोलनात सहभागी होतील. शांततामय मार्गा$ने बंद यशस्वी करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.>इंधन आणखी महागलेमुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरात रविवारी पुन्हा लीटरमागे अनुक्रमे १२ व १० पैसे वाढ झाली. मागील १७ दिवसातच पेट्रोल २.७९ व डिझेल ३.५५ रुपये प्रति लीटर कडाडले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पेट्रोलसाठी ८८ रुपयांहून अधिक तर डिझेलसाठी ७७ रुपये मोजावे लागत आहेत.राजस्थानने घटविला व्हॅटजयपूर : पेट्रोल-डिझेलचे भडकलेले दर कमी करण्यासाठी राजस्थान सरकारने चार टक्क्यांनी व्हॅट घटविला. यामुळे इंधन लीटरमागे अडीच रुपये स्वस्त होईल.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचा आज ‘भारत बंद’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 06:44 IST