Congress MP Varsha Gaikwad News: मुंबईची उपनगरीय रेल्वे ही लाइफलाइन आहे, परंतु दररोज होणारे अपघात आणि असुरक्षित प्रवासाने ती डेथलाइन बनली. लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रेल्वे विभाग व सरकारकडे सातत्याने लोकल सेवेबद्दल तक्रार करूनही त्यात काही फरक पडलेला नाही. मुंबईतील लोकल सेवेसाठी सरकारने काय काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत मुंबई उपनगरीय रेल्वेसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांतील आणि चालू वर्षातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या, अपघातांची प्रमुख कारणे, पीडित कुटुंबीयांना मिळालेली आर्थिक मदत, तसेच अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत. AI आधारित क्राऊड मॉनिटरिंग व प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबतही त्यांनी विचारणा केली.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरात सांगितले की, रेल्वे प्रशासन प्रवासी सुरक्षिततेसाठी ‘कवच’ प्रणाली सारख्या अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, वॉर रूम, विस्तृत फूट ओव्हर ब्रिज, डिजिटल कम्युनिकेशन यंत्रणा बसवणे. ७३ गर्दीच्या स्थानकांवर कायमस्वरूपी वेटिंग एरियाची उभारणी व प्रवेश नियंत्रण यंत्रणा उभारण्यावर भर देत आहे. अपघात ग्रस्त कुटुंबीयांना एकूण ३४.५५ लाख रुपये अनुग्रह मदत व २१६.८७ कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.