Rahul Gandhi Ram Mandir Ayodhya News: २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या राम मंदिरावर धर्म ध्वज स्थापन केला. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे ते प्रतीक आहे. राम मंदिर परिसरात अनेक मंदिरे स्थापन करण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांत कोट्यवधी भाविकांनी राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेतले. तसेच अनेक दिग्गज मंडळी, कलाकार, खेळाडूंनी अयोध्येत जाऊन राम मंदिरात दर्शन घेतले. यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी अजूनही राम मंदिरात गेलेले नाहीत.
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील काँग्रेस खासदार तनुज पुनिया यांनी सांगितेल की, राहुल गांधी लवकरच अयोध्येतील राम मंदिराला भेट देतील. जेव्हा राम मंदिराचे लोकार्पण झाले तेव्हा राहुल गांधींनी स्वतःहून सांगितले होते की, राम मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही, म्हणून ते अपूर्ण मंदिराला भेट देणार नाहीत. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ध्वजारोहण झाल्यावर राहुल गांधी राम मंदिराला भेट देणार होते, असे सांगितले गेले. आता राम मंदिरावर ध्वज फडकवण्यात आला आहे. राम मंदिर पूर्ण झाले आहे. राहुल गांधी आता रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जातील, असे म्हटले जात आहे.
राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार
राहुल गांधी त्यांच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार राम मंदिरात जातील. काँग्रेस खासदाराने असेही स्पष्ट केले की, राहुल गांधींना भगवान श्रीरामांवर श्रद्धा आहे आणि ते सर्व देवी-देवतांचा आदर करतात. संसदेत राहुल गांधींचे भाषण ऐकून स्पष्ट होते की, त्यांनी भगवान महादेव आणि भगवान राम यांचाही उल्लेख केला आहे. राहुल गांधी हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या परंपरांचा आदर करतात.
दरम्यान, २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रियांका गांधी या एक राष्ट्रीय नेत्या आहेत. संपूर्ण देश त्यांचा आदर करतो. त्या वायनाड, केरळच्या खासदार आहेत आणि त्यांचे रायबरेली, अमेठी आणि संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याशी कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांना एकाच राज्यापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही.