Congress MP Rahul Gandhi News: देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाचा २४ अकबर रोड हा पत्ता आता बदलला आहे. ४६ वर्षांनंतर काँग्रेसच्या मुख्यालयाचे नव्या ठिकाणी स्थलांतर झाले असून, मुख्यालयाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. आता काँग्रेसच्या मुख्यालयाचा नवा पत्ता हा ९-ए कोटला रोड, नवी दिल्ली हा असेल. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याह पक्षाचे इतर दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केले.
महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांचा दाखला देताना राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. देशातील निवडणूक प्रक्रियेत अतिशय गंभीर दोष आहेत. पारदर्शकता राहिलेली नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने पारदर्शीपणे काम करणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्ष केवळ भाजपा, RSS विरोधात नाही, तर व्यवस्थेविरोधातही लढत आहे
आपल्या देशातील निवडणुका निष्पक्षपातीपणे लढल्या जात आहेत, या भ्रमात राहू नका. काँग्रेस पक्ष केवळ भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातच लढा देत आहे, असा तुमचा समज असेल, तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. देशातील जवळपास सगळ्या संस्थांवर त्यांनी कब्जा केला आहे, आम्ही त्या व्यवस्थेविरोधातही लढत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत. आम्ही आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत नाराज आहोत. महाराष्ट्र आणि विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांची माहिती देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, पण ती देण्यास नकार दिला जात आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्या पारदर्शक करण्यास का नकार देत आहे? आम्हाला यादी न देण्याचा कारण काय आहे? पारदर्शीपणे काम करणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याने देशाची निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याचे लक्षात ठेवावे, असे राहुल गांधी म्हणाले.