Congress MP Rahul Gandhi News: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांनी ऑपरेशन सिंदूर, निवडणूक आयोग, बिहार निवडणूक असे काही विषय लावून धरले आहेत. बिहारमधील मतदार यादी व अन्य काही मुद्द्यांवर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ घालताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मते चोरण्याच्या निवडणूक आयोगांच्या डावपेचांचे १०० टक्के ठोस पुरावे आमच्याकडे आहेत. निवडणूक आयोग आपले काम योग्य पद्धतीने करत नाही. निवडणूक आयोगाने कोणत्याही भ्रमात राहू नये. निवडणूक आयोगाने केलेल्या गोष्टी सर्वांसमोर आणू. याचे परिणामही निवडणूक आयोगाला भोगावे लागतील. लोकशाही आणि संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सोडणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
९० नाही १०० टक्के पुरावे
आम्ही एखादी गोष्ट समोर आणण्याचा निर्णय करतो, तेव्हा ९० नाही, १०० टक्के पुरावे असतात. आम्ही फक्त एका मतदारसंघात पाहिले आणि असे लक्षात आले की, हजारो नवीन मतदार समाविष्ट केले आहेत. त्यांचे वय किती आहे? ४५, ५०, ६०, ६५. मला खात्री आहे की प्रत्येक मतदारसंघात तेच नाटक सुरू आहे. ही एक गोष्ट आहे. तसेच मतदारांचे नाव समाविष्ट करणे, काढून टाकणे, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे नवीन मतदार जोडले जात आहेत. इथेच आम्ही त्यांना पकडले, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
दरम्यान, कर्नाटकातही अशाच प्रकारची गडबड झालेली आहे. मी निवडणूक आयोगाला एक संदेश देऊ इच्छितो की, तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही यातून सुटाल, तुमच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की ते यातून सुटतील, तर तुम्ही चुकत आहात, तुम्ही यातून सुटू शकणार नाही कारण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.