मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा ‘मार्च’
By Admin | Updated: March 13, 2015 00:04 IST2015-03-13T00:04:00+5:302015-03-13T00:04:00+5:30
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा घोटाळ्यात आरोपी म्हणून समन्स देणे जुलमी असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया

मनमोहनसिंग यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा ‘मार्च’
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना कोळसा घोटाळ्यात आरोपी म्हणून समन्स देणे जुलमी असल्याची प्रतिक्रिया देत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी सिंग यांच्या निवासस्थानापर्यंत ‘मार्च’ काढत त्यांच्याप्रती एकजूटतेचे प्रदर्शन घडविले.
सकाळी काँग्रेस मुख्यालयात पक्ष कार्यकारिणीची बैठक घेतल्यानंतर सोनिया यांनी लगेच अर्धा कि.मी. अंतरावरील सिंग यांच्या निवासस्थानापर्यंत मार्च काढत पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. या मार्चमध्ये अंबिका सोनी, वीरप्पा मोईली, के. रहमान खान यांच्यासारखे दिग्गज सहभागी झाले होते. २००५ मध्ये ओडिशातील तालबरा-२ कोळसा खाणपट्टा आदित्य बिर्ला समूहाच्या हिंदाल्को कंपनीला वाटप करण्यात कोणताही गुन्हेगारी कट नव्हता असा अहवाल सीबीआयने दिल्यानंतरही सरकारने त्याबाबत हेतुपुरस्सर मौन पाळले असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
कालांतराने डॉ. मनमोहनसिंग यांच्यासंबंधी समन्स मागे घेतले जाईल याचा मला विश्वास असल्याचे चिदंबरम यांनी म्हटले. सीबीआय हा सरकारचा प्रशासकीय भाग असतानाही भाजपने याबाबत पाळलेले मौन दु:खद आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याला कोणताही आधार नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले आहे. सरकारने सीबीआयच्या या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी मौन सोडावे.
सरकार तसे करण्याला मागेपुढे का पाहात आहे, असा सवाल चिदंबरम यांनी केला. डॉ. मनमोहनसिंग हे संशयाच्या सावटापेक्षा मोठे असून सत्य बाहेर येईल, असा विश्वास आनंद शर्मा यांनी व्यक्त केला. राज्यसभेचे उपसभापती पी.जे. कुरियन हे डॉ. मनमोहनसिंग यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचले, मात्र ते मार्चमध्ये सहभागी झाले नव्हते.
डॉ. सिंग यांनी बुधवारी खटल्यात निरपराधित्व सिद्ध करेन असा विश्वास व्यक्त करतानाच निराश झाल्याची कबुली दिली होती. हा जीवनाचा भागच आहे. कायदेशीर छाननीसाठी मी नेहमीच तयार राहिलो आहे. सर्व तथ्यानिशी बाजू मांडण्याची मला संधी मिळेल आणि सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. विशेष न्यायालयाने बुधवारी डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी. पारख व अन्य तिघांना समन्स जारी करीत ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर होण्याचा आदेश दिला आहे. काँग्रेस पक्ष, सोनियाजी, कार्यकारिणीचे सर्व सदस्य व ज्येष्ठ नेत्यांनी घरी येत संघर्षासाठी एकजूटता दाखविल्याबद्दल मी खूप आभारी आहे, असे ते म्हणाले. पक्षाच्या मार्चमुळे या प्रकरणात कसा फायदा होणार? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी व सोनिया यांनी टाळले.
आरोप नसताना समन्स कसा?
सीबीआयच्या अहवालावर सरकारची अनिच्छा प्रश्न उपस्थित करणारी आहे. न्यायालयाने कलम ३१९ नुसार डॉ. सिंग व इतरांविरुद्ध समन्स जारी केला मात्र सीबीआयने कोणताही गुन्ह्णाचा आरोप केलेला नाही, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले. डॉ. सिंग यांचे निवेदन नोंदवून घेतल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कारवाई सुरू करण्याला कोणताही आधार नाही, या निष्कर्षाप्रत सीबीआय पोहोचली होती. डॉ.सिंग यांचे वकील सर्व तथ्य व परिस्थिती न्यायालयासमोर ठेवेल तेव्हा स्वत: न्यायालयच आपल्या निर्णयावर फेरविचार करून खटल्याची प्रक्रिया थांबवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)