नवी दिल्ली: काँग्रेसचा खोटेपणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अपमान लपवू शकत नसल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षाला लक्ष्य केले. गृहमंत्री अमित शाहांनी संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या काळ्या इतिहासाची पोलखोल केली आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष स्तब्ध असल्याचा दावा करत मोदींनी बाबासाहेबांचा अपमान केल्याच्या आरोपाचा सामना करणाऱ्या अमित शाहांची बुधवारी पाठराखण केली.
आम्हाला बाबासाहेबांबद्दल आदर असल्याचे मोदी म्हणाले. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदी यांनी जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एकच कुटुंब नेतृत्व करत असलेल्या पक्षाने आंबेडकरांचा वारसा संपविण्यासोबतच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समुदायाचा अवमान करण्यासाठी कशा प्रकाराचे गलिच्छ राजकारण केले हे भारताच्या लोकांनी वारंवार पाहिले आहे.
आज आम्ही जे काही आहोत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आमच्या सरकारने गत एक दशकात डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा मोदींनी केला.
अमित शाहांनी वस्तुस्थिती मांडल्यामुळे विरोधक स्तब्ध आहेत. आता विरोधकांनी नाटक सुरू केले आहे. डॉ. आंबेडकरांबद्दल अनेक वर्षांपासून सुरू असलेली दुर्भावनापूर्ण लबाडी व अनेक वर्षांपासूनची कुकर्म लपवता येतील, असे काँग्रेस व त्यांच्या दूषित इकोसीस्टमला वाटत असेल तर ते गंभीर चूक करताहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान