मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची पदयात्रा
By Admin | Updated: March 12, 2015 17:41 IST2015-03-12T10:29:55+5:302015-03-12T17:41:01+5:30
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलेल्या डॉ.मनमोहन सिंग यांच्या समर्थनासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली.

मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची पदयात्रा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी करत समन्स बजावल्यानंतर सिंग यांच्या समर्थनासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली. २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयापासून मनमोहन सिंग यांच्या घरापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत पक्षाचे सर्व प्रमुख नेेते उपस्थित होते. त्यानंतर सोनिया गांधी व अन्य नेत्यांनी सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठिशी उभा असल्याचा संदशे दिला.
तत्पूर्वी गुरूवारी सकाळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस कार्यकारण समितीची बैठक घेतली. त्यावेळी सर्व खासदार उपस्थित होते. मनमोहन सिंग यांच्या बाजूने उभे राहून लढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
भारताचे माजी पंतप्रधान असलेले डॉ. मनमोहन सिंग हे निर्दोष असून त्यांच्या विश्वासार्हतेवर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही असे सोनिया गांधी यांनी सांगितले. या लढाईत डॉ. सिंग यांच्या पाठिशी संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा आहे, असेही त्या म्हणाल्या.
कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालबिरा-२ हा कोळसा खाणपट्टा देण्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रस्थापित पद्धतीचा भंग करून संमती दिल्याने या खासगी कंपनीस मोठ्या नफ्याचे घबाड मिळाले व परिणामी सरकारी न्येवेली लिग्नाईट कॉर्पोरेशनचे नुकसान झाल्याचे सकृद्दर्शनी दिसते, असे मत नोंदवत ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने डॉ. सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी करत ८ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले. सीबीआयने सादर केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ अमान्य करत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी डॉ. सिंग यांच्याखेरीज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी.सी. पारख, हिंदाल्को कंपनी व हिंदाल्कोचे वरिष्ठ अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही समन्स जारी केले.