उत्साहाच्या भरात काँग्रेस नेता राहुल गांधींना म्हणाला "पप्पू"
By Admin | Updated: June 14, 2017 12:20 IST2017-06-14T12:10:41+5:302017-06-14T12:20:14+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जाणुनबुजून "पप्पू" उल्लेख करणा-या उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे

उत्साहाच्या भरात काँग्रेस नेता राहुल गांधींना म्हणाला "पप्पू"
>ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 14 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा जाणुनबुजून "पप्पू" उल्लेख करणा-या उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. या नेत्याला सर्व पदावरुन हटवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील मंदसौर येथे राहुल गांधी यांनी केलेल्या दौ-यासंबंधी या नेत्याने सोशल मीडियावर काही मेसेज केले होते. या मेसेजमध्ये राहुल गांधींचा उल्लेख "पप्पू" असा करण्यात आला होता.
विरोधक राहुल गांधींची खिल्ली उडवण्यासाठी "पप्पू" असं त्यांना संबोधतात. अनेकदा सोशल मीडियावर पप्पू असा उल्लेख करत राहुल गांधींच्या नावे पोस्ट फिरत असतात. काँग्रेस पक्षाचे मेरठ जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी व्हाट्सअॅपवर काही मेसेज पाठवले होते. "इंडियन नॅशनल काँग्रेस" नावाच्या ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये विनय प्रधान यांनी राहुल गांधीचा पप्पू असा उल्लेख केला होता.
खरंतर विनय प्रधान यांना राहुल गांधींचं मंदसौर दौ-यासाठी कौतुक करायचं होतं. देशासाठी आपला स्वार्थ त्यांनी बाजूला ठेवला असं त्यांना सांगायचं होतं. पण झालं भलतंच, त्यांनी लिहिलं की, "अदानी, अंबानी किंवा मल्ल्याशी पप्पू हातमिळवणी करु शकत होता, पण त्याने केलं नाही. पप्पू एखादा मंत्री किंवा पंतप्रधान होऊ शकत होता, पण तो त्यामार्गे गेला नाही. मंदसौरला जाऊन त्याने आपलं आयुष्य धोक्यात घातलं".
काँग्रेस शिस्तपालन समितीचे अध्यक्ष रामकृष्ण द्विवेदी यांनी विनय प्रधान यांना चिथावणीखोर संदेश पाठवण्याच्या आरोपाखाली सर्व पदांवरुन हटवण्यात असल्याचं पत्रक जारी केलं आहे. पक्षनेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ते बोलले आहेत. तसंच यामध्ये इतर पक्षही सहभागी असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. विनय प्रधान यांनी मात्र आपण हा संदेश पाठवला नसून आपल्याला बाजू मांडण्याची एकही संधी दिली नसल्याचं म्हटलं आहे.