काँग्रेसने दिल्लीतही बदलला कारभारी
By Admin | Updated: March 3, 2015 00:48 IST2015-03-03T00:48:00+5:302015-03-03T00:48:00+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या आग्रहानुरूप काँग्रेसने पाच राज्यांमध्ये संघटनात्मक नेतृत्वात फेरबदल केले आहेत.

काँग्रेसने दिल्लीतही बदलला कारभारी
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या आग्रहानुरूप काँग्रेसने पाच राज्यांमध्ये संघटनात्मक नेतृत्वात फेरबदल केले आहेत. संसदेच्या अधिवेशनातच राहुल गांधी दोन आठवड्यांच्या चिंतन रजेवर गेले असून ते परतण्याच्या बेतात असतानाच हे बदल जाहीर झाले आहेत. ही राहुल यांच्या प्रभावाची चुणूक मानली जात असून लवकरच अपेक्षित असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील बदलात हिंगोलीचे खा. राजीव सातव, आरपीएन सिंग यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.
सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी जारी केलेल्या पत्रकात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या नियुक्त्या केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय आ. मल्लु भाटी विर्कमार्का यांची तेलंगणा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
जम्मू-काश्मिरात गुलाम अहमद मीर हे सैफुद्दिन सोझ यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. गुजरातमध्ये अर्जुन मोधवाडिया यांच्या जागी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष झालेले भरतसिंग सोळंकी हे माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री माधवसिंग सोळंकी यांचे पुत्र आहेत.
अजय माकन यांना दिल्ली निवडणुकीत काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख बनविण्यात आले त्याचवेळी ते दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रमुख होणार हे निश्चित मानले जात होते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
हे बदल म्हणजे राज्यांमध्ये अ.भा. काँग्रेस कार्यकारिणीत होणाऱ्या बदलांची सुरुवात आहे. पक्षाचे अनेक सरचिटणीस बदलणार आहेत. याशिवाय पक्षाने सरचिटणीस बी.के. हरिप्रसाद आणि सचिव मैनुल हक यांची जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी होणाऱ्या बैठकीला निरीक्षक आणि सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.