बिहारमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी
By Admin | Updated: November 9, 2015 00:42 IST2015-11-09T00:42:36+5:302015-11-09T00:42:36+5:30
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे.

बिहारमुळे काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पराकोटीच्या नैराश्याचा सामना करीत असलेल्या काँग्रेसला बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी नवसंजीवनी मिळाली आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आता समविचारी पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला घेरण्याची आपली मोहीम अधिक तीव्र करील; परंतु देशभरातील आघाडीच्या राजकारणावर मात्र राज्य पातळीवरच आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यात येतील.
आपले धर्मनिरपेक्षतेचे राजकारण आजही प्रासंगिक आहे, असा काँग्रेसचा समज आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पत्रपरिषदेत याबाबत जाहीर खुलासादेखील केला आहे. द्वेष आणि विभाजनाचे राजकारण चालणार नाही, हे बिहार निवडणूक निकालांवरून स्पष्ट झाले आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रा. स्व. संघावर थेट हल्लाबोल करताना ते म्हणाले, हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडून निवडणूक जिंकली जाऊ शकत नाही.
मोदींनी विदेश दौरे बंद करावेत आणि शेतकरी व युवकांना भेटावे, असा सल्लाही बिहार निवडणूक निकालामुळे अत्याधिक आनंदी झालेले राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना दिला. येणाऱ्या काळात देशाच्या राजकारणात मोठे बदल झालेले दिसतील, असे संकेत राहुल गांधी यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, ‘या देशात विभाजनाच्या राजकारणाला कोणतेही स्थान नाही. बिहार निवडणुकीचे निकाल केवळ बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. मोदींनी आता भाषणे देणे बंद करून कामाला लागावे.