काँग्रेसचे महाधिवेशन जयपूर अथवा चंदीगडमध्ये होणार; अध्यक्ष निवडीसाठी पक्षात हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:06 AM2020-12-30T00:06:07+5:302020-12-30T07:00:39+5:30
अध्यक्ष निवडीसाठी पक्षात हालचाली
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अध्यक्षांकडून मधुसूदन मिस्त्री यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेला निवडणूक आयोग अधिवेशनापूर्वी सदस्यता अभियानाचे काम पूर्ण करू इच्छितो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्व नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी एक वा दोन दिवसांचे महाअधिवेशन बोलविण्यावर गांभीर्याने विचार करीत आहे. महाअधिवेशनासाठी ज्या दोन ठिकाणांचा विचार केला जात आहे त्यात जयपूर आणि चंदीगड यांचा समावेश आहे. हे अधिवेशन जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीत सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. अर्थात, यावर अंतिम निर्णय घेणे अद्याप बाकी आहे. कारण, सरकारने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
पक्षाची अशी इच्छा आहे की, महाअधिवेशन एकतर अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी अथवा त्यानंतर बोलविले जावे. या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होईल, तर कोलकाता आणि तिरुपतीच्या धर्तीवर कार्य समितीच्या सदस्यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. कारण, ग्रुप २३ चे नेत सातत्याने दबाव आणत आहेत की, कार्य समितीच्या सदस्यांची पक्ष नेतृत्वाने निवड करावी.