भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेस रस्त्यावर
By Admin | Updated: March 16, 2015 23:37 IST2015-03-16T23:37:29+5:302015-03-16T23:37:29+5:30
काँग्रेस जन सोमवारी रस्त्यावर उतरले. केंद्राच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करीत काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संसदेकडे कूच केले.

भूसंपादन विधेयकाविरुद्ध काँग्रेस रस्त्यावर
नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकाचा मुद्दा संसदेत आक्रमकपणे लावून धरल्यानंतर काँग्रेस जन सोमवारी रस्त्यावर उतरले. केंद्राच्या भूसंपादन विधेयकाला विरोध करीत काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संसदेकडे कूच केले. यावेळी पोलिसांसोबत उडालेल्या संघर्षात भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा ब्रार यांच्यासह अनेक जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या भट्टा परसौल गावातून शुक्रवारी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी भूसंपादन विधेयकाविरोधात पदयात्रा सुरू केली होती. काल रविवारी रात्री ही पदयात्रा राजघाटावर पोहोचली. सोमवारी सकाळी आॅस्कर फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संसदेकडे कूच केले. रणदीप सूरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवा कार्यकर्तेही त्यांना मिळाले. जंतरमंतरवरून संसदेकडे कूच करणाऱ्या काँग्रेस जनांनी बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करीत पाण्याचा मारा केला. यावेळी अनेक जण जखमी झाले. तत्पूर्वी, जंतरमंतर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, जयराम रमेश, अंबिका सोनी, अहमद पटेल आदींनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले. पत्रकारांशी बोलताना जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर तीव्र ताशेरे ओढले. भूसंपादन कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीविरोधात आमची लढाई सुरू राहील, असे ते म्हणाले. गत आठवड्यात अनेक दुरुस्त्यांनंतर लोकसभेत भूसंपादन विधेयक पारित झाले होते. अद्याप ते राज्यसभेत पारित झालेले नाही.
सोनिया गांधी यांच्या संदेशाचे वाचन
४काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जंतरमंतरवरील निदर्शनादरम्यान हजर नव्हत्या. मात्र, अहमद पटेल यांनी त्यांचा संदेश पक्ष कार्यकर्त्यांना वाचून दाखविला. मी कायम आपल्या सोबत आहे. काँग्रेस जनांच्या प्रत्येक आंदोलनास माझा पाठिंबा आहे, असे सोनियांनी आपल्या संदेशात म्हटले होते.