पंतप्रधानांना काँग्रेसचा कृतज्ञतापूर्ण निरोप
By Admin | Updated: May 15, 2014 02:14 IST2014-05-15T02:14:22+5:302014-05-15T02:14:22+5:30
डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री आयोजित केलेल्या निरोपाच्या भोजन समारंभास पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली.

पंतप्रधानांना काँग्रेसचा कृतज्ञतापूर्ण निरोप
नवी दिल्ली : संपुआ आघाडीच्या सरकारचे पंतप्रधान म्हणून सलग दहा वर्षे समर्थपणे नेतृत्त्व केलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री आयोजित केलेल्या निरोपाच्या भोजन समारंभास पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. लोकसभेचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस आधी संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित या भोजन समारंभास ८१ वर्षांच्या मनमोहन सिंग यांना पक्षनेत्यांनी कृतज्ञतापूर्वक निरोप दिला. यावेळी सर्व प्रमुख काँग्रेस नेते व केंद्रीय मंत्री यांच्या स्वाक्षर्या असलेले एक स्मृतीचिन्ह डॉ. सिंग यांना देण्यात आले. पल्लम राजू यांनी त्या स्मृतीचिन्हावर कोरलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे मानपत्र वाचून दाखवले. डॉ. सिंग व त्यांच्या पत्नी गुरशरण कौर यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सिंग दाम्पत्य आणि सोनिया गांधी यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठी अनेकांनी झुंबड केली. या सर्वांमध्ये मात्र राहुल गांधी यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. राहुल गांधी दिल्लीबाहेर असल्याने हजर राहू शकले नाहीत, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची बैठक घेऊन डॉ. सिंग औपचारिकपणे पंतप्रधानपद सोडतील. जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांच्याखेरीज सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा मान डॉ. सिंग यांनी भूषविला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)