नवी दिल्ली - राष्ट्रगीतावरून वाद होणे आपल्यासाठी आता नवीन राहिलेले नाही. आता एका खासदाराने केलेल्या मागणीमुळे राष्ट्रगीतावरील वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे. राष्ट्रगीतामधून सिंध शब्द वगळून त्याऐवजी नॉर्थईस्ट शब्दाचा समावेश करावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रिपून बोरा यांनी राज्यसभेत केली आहे. राष्ट्रगीतामधून सिंध शब्द वगळण्याची मागणी करण्यामागचा तर्क देताना बोरा म्हणाले, "राष्ट्रगीतामधील सिंध हा शब्द सिंध प्रांतांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु हा भाग आता पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे हा शब्द राष्ट्रगीतामधून वगळण्यात यावा, त्याजागी देशाचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या नॉर्थईस्टचे नाव समाविष्ट केले जावे." बोरा यांनी यासंदर्भातील खाजगी विधेयक राज्यसभेत मांडले आहे. काँग्रेस खासदार बोरा हे संसदेमध्ये आसामचे प्रतिनिधित्व करतात."पूर्वोत्तर भारत हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र राष्ट्रगीतामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. दुसरीकडे पाकिस्तानचा भाग असलेल्या सिंध प्रांताचा उल्लेख मात्र राष्ट्रगीतामध्ये आहे. दरम्यान, राष्ट्रगीतामधील सिंध या शब्दावरून याआधीही वाद झाले होते.
राष्ट्रगीतामधून सिंध शब्द वगळा, काँग्रेस खासदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 18:31 IST