काश्मिरात संघर्षाची धग
By Admin | Updated: August 21, 2015 22:38 IST2015-08-21T22:38:23+5:302015-08-21T22:38:23+5:30
श्रीनगर येथे शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर निदर्शने करताना काही युवकांनी तिरंगा जाळला आणि दहशतवादी संघटना आयएसआयएस (इसिस) आणि पाकिस्तानचे

काश्मिरात संघर्षाची धग
श्रीनगर : श्रीनगर येथे शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर निदर्शने करताना काही युवकांनी तिरंगा जाळला आणि दहशतवादी संघटना आयएसआयएस (इसिस) आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविले. यावेळी आंदोलनकर्ते आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये तुफान संघर्ष झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही युवकांनी निदर्शने करताना तिरंगा आणि पीडीपीचे झेंडे जाळले. शुक्रवारच्या नमाजनंतर लगेच काही युवकांनी नौहट्टा भागातील जामिया मशीदजवळच्या एका शॉपिंग आर्केडजवळ येऊन आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविले.
या दरम्यान, काही निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरात आयएसआयएस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, हे येथे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)