बंडखोरांना चोख उत्तर देण्याची केंद्राची ग्वाही
By Admin | Updated: December 25, 2014 01:46 IST2014-12-25T01:46:22+5:302014-12-25T01:46:22+5:30
आसाममधील दहशतवादी कृत्याची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करतानाच बंडखोरांना सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह

बंडखोरांना चोख उत्तर देण्याची केंद्राची ग्वाही
गुवाहाटी/नवी दिल्ली : आसाममधील दहशतवादी कृत्याची तीव्र शब्दात निर्भर्त्सना करतानाच बंडखोरांना सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत बोलताना दिली. तर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री तरुण गोगई यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएफबीच्या सोंगबिजित गटाच्या सशस्त्र बंडखोरांनी मंगळवारी रात्री आसामच्या दुर्गम भागातील तीन जिल्ह्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सोनितपूर जिल्ह्यातील ३७, कोकराझर येथील २५ आणि चिरांग जिल्ह्यात ३ जण ठार झाले होते. या हत्याकांडाविरुद्ध आदिवासींनी सुरु केलेले आंदोलन सोनितपूर जिल्ह्याच्या धेकियाजुलीमध्ये हिंसक झाले. आधी पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव काबूत न आल्यामुळे अखेर पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात तिघे ठार झाले, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आंदोलकांवरील पोलिसांच्या गोळीबाराचा राज्यात सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)