गोडसेच्या उदात्तीकरणाबद्दल राज्यसभेत चिंता
By Admin | Updated: February 28, 2015 05:38 IST2015-02-28T01:05:08+5:302015-02-28T05:38:17+5:30
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत

गोडसेच्या उदात्तीकरणाबद्दल राज्यसभेत चिंता
नवी दिल्ली : महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे सांगून काँग्रेसचे सदस्य हुसैन दलवाई यांनी शुक्रवारी राज्यसभेत गोडसेचे उदात्तीकरण करण्याच्या प्रयत्नावर चिंता व्यक्त केली. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना दलवाई म्हणाले, महात्मा गांधींनी आम्हाला आपल्या अधिकारासाठी लढण्यास शिकविले आहे; परंतु आज त्यांचाच मारेकरी नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गोडसेच्या नावावर मंदिर बांधण्याचा आणि पुलाला त्याचे नाव देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा घटना चिंताजनक आहेत. अशा खुन्याची पूजा करण्याचे थांबविले पाहिजे. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते; परंतु मोदींकडून त्याचे उत्तर आले नाही, असे दलवाई म्हणाले. नोबेल पुरस्कार विजेते आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनीही अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. दलवाई यांच्या म्हणण्याला राज्यसभेतील अनेक सदस्यांनी पाठिंबा दिला. या दरम्यान भाजपचे तरुण विजय म्हणाले, आम्ही महात्मा गांधींना वंदनीय मानतो, गोडसेला नाही. त्याआधी विजय यांनी अंदमान निकोबार येथे ब्रिटिश राजवटीत व्हाईसरायविरुद्धच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेर अली यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)