सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीसाठी संयुक्त मर्यादा
By Admin | Updated: July 17, 2015 04:23 IST2015-07-17T04:23:45+5:302015-07-17T04:23:45+5:30
विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सरकारने थेट विदेशी गुंतवणूक धोरण अधिक सुलभ केले असून सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीला एकाच व्याप्तीत आणून विविध

सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीसाठी संयुक्त मर्यादा
नवी दिल्ली : विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढविण्यासाठी सरकारने थेट विदेशी गुंतवणूक धोरण अधिक सुलभ केले असून सर्व प्रकारच्या विदेशी गुंतवणुकीला एकाच व्याप्तीत आणून विविध उद्योगांसाठी विदेशी गुंतवणुकीची संयुक्त मर्यादा निश्चित करण्यास मंजुरी दिली आहे. याचा फायदा किरकोळ व्यवसाय क्षेत्रात कंपन्या, शेअर बाजार आणि अन्य क्षेत्राला गुंतवणुकीच्या स्वरूपात होऊ शकतो.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, आतापासून एफआयआय, एनआरआय आणि अन्य विदेशी गुंतवणुकीची श्रेणी एकच असेल. याला संयुक्त मर्यादा समजले जाईल. थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरण सुलभ करणे, हा यामागचा उद्देश होता. जेणेकरून विदेशी गुंतवणूक अधिक प्रमाणात आकर्षित करून व्यवसाय अधिक सुलभ व्हावा. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयाच्या या प्रस्तावामुळे विदेशी गुंतवणुकीचे विविध श्रेणीबाबतच्या मर्यादेसंदर्भातील संदिग्धता दूर होईल.
कृषी, चहा, खनन, प्रसारण, मीडिया, एअरपोर्ट, किरकोळ (एकेरी-बहुविध ब्रँड) ई-कॉमर्स, बँकिंग, विमा यासारख्या क्षेत्रांसाठी विदेशी गुंतवणुकीची संयुक्त मर्यादा निश्चित करण्याचा मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार एफडीआय, एफआयआय आणि एनआरआय सारख्या विविध श्रेणीतील गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या मर्यादा आहेत. विदेशी गुंतवणुकीच्या संयुक्त व्याप्तीत थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय), एफपीआय, एफआयआय आणि क्यूएफआय (विदेशी संस्थात्मक आणि पात्र विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार), एनआरआय (अनिवासी भारतीय) आणि एफवायसी (विदेशी उद्योग भांडवली गुंतवणूकदार) या श्रेणीतील गुंतवणुकीचा समावेश असेल.