दक्षिण मुंबईत फुटला प्रचाराचा नारळ

By Admin | Updated: September 22, 2014 09:49 IST2014-09-22T04:51:46+5:302014-09-22T09:49:05+5:30

आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर महायुतीमधील शिवसेना-भाजपासारखे बलाढय़ पक्ष जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंग असले

Coconut procession in south Mumbai | दक्षिण मुंबईत फुटला प्रचाराचा नारळ

दक्षिण मुंबईत फुटला प्रचाराचा नारळ

मुंबई : आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी, तर महायुतीमधील शिवसेना-भाजपासारखे बलाढय़ पक्ष जागावाटपाचा तिढा सोडवण्यात गुंग असले, तरी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी संभाव्य उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभरापासून दक्षिण मुंबईतील प्रमुख पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी सार्वजनिक मंडळांसोबत गृहनिर्माण सोसायटीच्या मंडळांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
याउलट बलाढय़ पक्षांच्या उमेदवारांमार्फत थेट प्रचार होत नसल्याचा फायदा घेत अपक्ष उमेदवार दारोदारी जाऊन स्वत:चा प्रचार करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भायखळ्यातील अपक्ष उमेदवार रोहिदास लोखंडे यांनी सुंदर गल्लीतील इमारतींना भेटी देत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर उमेदवारीची खात्री असलेल्या मुंबादेवीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाव्य उमेदवार इम्तियाज अनिस यांनी गेल्या आठवडाभरापासून प्रचार सुरू केला आहे.
याउलट उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी वरिष्ठांकडून संदेश मिळालेल्या काही उमेदवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. वरळीतील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुनील शिंदे यांनी नुकत्याच घेतलेल्या मेळाव्याची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड केली आहेत. तर मनसेचे भायखळ्यातील संभाव्य उमेदवार संजय नाईक यांनी सोमवारच्या मेळाव्यात सर्व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्याआधीच संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केल्याचे चित्र दक्षिण मुंबईत दिसत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, प्रचाराची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवत असल्याचे निदर्शनास आले. त्याची जबाबदारी उमेदवारांनी कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. प्रत्येक गाठीभेटीची छायाचित्रे कार्यकर्ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर अपलोड करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Coconut procession in south Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.