उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर तेट निशाणा साधला. योगींनी प्रथम किराडी आणि नंतर करोल बाग येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी, रस्ते, वीज, पाणी आणि गटार यांसारख्या मुद्द्यांवर आप सरकारला घेरले. यावेळी त्यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करतही आपला घेरले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोहिंग्या आणि बांगलादेशींचा उल्लेख करत, आपच्या नेत्यांनी त्यांना वसवल्याचा आरोप केला. ते म्हणाले, जामियाजवळील यूपीच्या जमिनीवरही असेच काही घडले होते, तेव्हा आपण बुलडोझर कारवाई केली आणि सर्वांना हटवले. यावेळी त्यांनी जामिया आणि ओखलासह शाहीन बागचाही उल्लेख केला.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी ओखला औद्योगिक क्षेत्र आणि न्यू ओखला (नोएडा) येथील उद्योगांची तुलना करत, आरोप केला की, आप सरकार बांगलादेशी घुसखोरांना वसवण्यात व्यस्त आहे. योगी म्हणाले, "त्यांच्याकडे केवळ एकच उद्योग आहे. त्यांनी ओखला आणि दिल्लीतील प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांना वसवण्याचे काम केले. दोन वर्षांपूर्वी, जामिया मिलिया आणि त्याच्या आसपासच्या भागात, उत्तर प्रदेश सरकारच्या सिंचन विभागाच्या जमिनीवर, त्यांचे आमदार, अधिकारी आणि नगरसेवकांनी बांगलादेशी घुसखोरांना वसवले होते हे तुम्ही पाहिले असेलच. मी त्यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की उत्तर प्रदेशच्या जमिनीवर वसवू नका. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी मला उत्तर प्रदेशातून बुलडोझर पाठवावे लागले. मी निर्दयतेने सरकारी जमीन खाली केली. नंतर, तेथे बॅरिकेड करण्यात आले आणि तेथे यूपी पीएसी तैनात करण्यात आली."
योगी पुढे म्हणाले, "दिल्लीतील जनतेसाठी एखादी संस्था बनत असेल, काही सुविधा तयार होत असेल, तर आपण जमीन उपलब्ध करून देऊ. मात्र, परदेशी घुसखोरांसाठी एक इंचही जमीन देणार नाही."
दिल्लीतील दंगलींचा उल्लेख करताना योगी म्हणाले, "दिल्लीत वीज, पाणी, सार्वजनिक सुविधा नाहीत. मात्र, बांगलादेशी घुसखोरांच्या मदतीने, येथील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने २०२० मध्ये निर्दयीपणे दंगल घडवून आणली. त्यांनी शाहीन बागमध्ये कशा प्रकारे अराजक आणि गुंडगिरीचे काम केले. याची आठवण करून देत योगी म्हणाले, ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार सत्तेत आहे, तेथे स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण आहे."