Waqf Amendment Bill: वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचा विचार करणाऱ्या संसदेच्या संयुक्त समितीने अहवालाचा मसुदा आणि सुधारित विधेयक बहुमताने स्वीकारले आहे. खासदारांना असहमती नोंदवण्यासाठी बुधवार पर्यंतची मुदत देण्यात आली होती. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षानेही या विधेयकावर आपली असहमती दर्शवली. यावरुन आता भाजपने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी असल्याचे म्हटलं आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकाचा आढावा घेणाऱ्या संयुक्त संसदीय समितीने बुधवारी या मसुद्याला मंजुरी दिली. जेपीसीच्या या निर्णयावर विरोधकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही समावेश होता. ठाकरे यांनीही जेपीसीच्या निर्णयाबाबत असहमत व्यक्त करत निषेध व्यक्त केला. ठाकरे गटाच्या खासदारांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या विरोधात भाष्य केलं. यावरुनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते दिल्लीत बोलत होते.
"मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सातत्याने लांगूलचालनाची भूमिका घेतलेली आहे. केवळ एका समाजाच्या पाठीशी उभं राहायचं ही काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा होती. ती अल्पसंख्याक लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरेंच्या सेनेने अंगीकारली हे पाहून मला अतिशय दुःख झालेलं आहे. कारण वक्फ बोर्डाचे बिल हे कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. मुस्लिम समाजाच्या तर विरोधात बिलकुल नाही. या ठिकाणी वक्फच्या माध्यमातून जो गैरकारभार आणि गैरव्यवहार चाललेला आहे तो संपला पाहिजे म्हणून हे विधेयक आणलेलं आहे. अशावेळी फक्त मतांच्या लाचारी करता याचा विरोध ते करत असतील तर मला वाटतं की महाराष्ट्रातील जनता हे पाहते आहे. कशाप्रकारे ते लांगूलचालन करत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलंय," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वक्फने मातोश्रीवर दावा सांगितल्यावर समजेल - नितेश राणे
दरम्यान, मंत्री नितीश राणे यांनीबी उद्धव ठाकरे यांचे एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ असे वर्णन केले आहे. तसेच वक्फ बोर्डाने मातोश्रीवर दावा केल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल, असेही नितेश राणे म्हणाले. "ठाकरेंची शिवसेना मुस्लिम लीगसारखी आहे. लीग जे काही ठरवते, शिवसेना तेच करते. वक्फ बोर्ड जेव्हा मातोश्रीवर हक्क सांगेल, तेव्हाच यांना समजेल," असं नितेश राणेंनी म्हटलं.