CM Devendra Fadnavis Meet Amit Shah News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत काय झाले, बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सन २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्याच्या आठवणींची जखमी प्रत्येक मुंबईकरांच्या मनात आहे. शेकडो निरपराध्यांचे प्राण घेणाऱ्या या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा तहव्वूर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. २६/११चा अपराधी, मास्टरमाइंड तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेने होकार दिला आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यासाठी अमेरिकी प्रशानसाला तयार केले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. मागच्या काळात आम्ही प्रयत्न करून त्याची ऑनलाइन साक्ष मिळवू शकलो, त्यामुळे पाकिस्तानचा या हल्ल्यातील हात असल्याचे दाखवू शकलो. तो भारताचा अपराधी आहे, त्यामुळे भारताला तो अपराधी म्हणून उपलब्ध झाला पाहिजे. त्याला शिक्षा देता आली पाहिजे, अशी आपली मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती मागणी रेटली आणि तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता मिळाली आहे. २६/११ ला आता खरा न्याय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमके काय झाले? कशावर चर्चा झाली?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या झालेल्या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जे तीन नवे कायदे तयार झाले आहेत, त्या तिन्ही कायद्यांसंदर्भात एक आढावा बैठक अमित शाह यांनी घेतली. हे तीन कायदे तयार झाल्यानंतर राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी कशी झाली आहे? त्याकरिता ज्या इन्स्टिट्युशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचे होते. त्याची तयारी किती झाली आहे? किती केस रजिस्टर झाल्या त्याची माहिती घेतली. फॉरेन्सिक व्हॅन जाऊन कशा केसवर काम करू शकतात, त्याची माहिती दिली. किती लाख लोकांचे ट्रेनिंग पूर्ण झाली त्याची माहिती अमित शाह यांना आम्ही दिली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, ऑनलाइन कोर्ट क्युबिकल कस जोडता येईल, कोर्टातील गर्दी कमी करण्यासाठी काय करता येईल याची माहिती दिली. कमीत कमी वेळेत केस कशी निकाली निघेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तिन्ही कायदे लागू करण्याची प्रक्रिया राज्यात व्यवस्थित सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.