सध्या संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. त्यामुळे लोकांना रात्रीच्या वेळी घरातच राहणं पसंत करत आहेत. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी आसरा शोधत आहेत. तर रात्रीच्या वेळी असलेल्या ट्रेनमधून प्रवासाला जाणारे प्रवासीही रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर काही काळ थांबतात. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील लखनौमधून रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लखनौमधील चारबाग रेल्वे स्टेशनवर रात्री झोपलेल्या प्रवाशांवर सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक पाणी फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे थंडीने हुडहुडी भरलेले ट्रेनची वाट पाहत असलेले प्रवासी उठले. त्यांच्याकडील सामान, अंथरूण पांघरुण पाण्यामुळे भिजून गेले. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. तसेच लोकांकडून झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या संवेदनहिनतेबाबत रेल्वेने संबंधित एजन्सीकडून उत्तर मागितले आहे. तसेच पुन्हा असे न करण्याची ताकिद संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. चारबाग स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ वर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत स्पष्टीकरण देताना उत्तर रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, प्लॅटफॉर्म क्रमांक ८ आणि ९ वर सफाईचं काम सुरू असतानाचा हा व्हिडीओ आहे. प्रवाशांबाबत ज्या प्रकारची संवेदनहीनता दाखवण्यात आली त्याबाबत संबंधित एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. दरम्यान, लोकांकडून रेल्वे अधिकाऱ्यांबाबतही संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासी झोपले असताना त्यांच्यावर पाणी फेकून सफाई करणं योग्य आहे का, असा सवाल लोकांकडून विचारण्यात येत आहे.