गुरू-शिष्य परंपरेतूनच शास्त्रीय गायक घडतात (भाग १)
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:25+5:302015-02-13T00:38:25+5:30
- युवा गायक राहुल देशपांडे : शास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवा

गुरू-शिष्य परंपरेतूनच शास्त्रीय गायक घडतात (भाग १)
- ुवा गायक राहुल देशपांडे : शास्त्रीय संगीताला लोकाश्रय हवानागपूर : विविध शास्त्रीय संगीताच्या घराण्यांच्या तालमीत पूर्वी गायक तयार व्हायचे. कारण त्यावेळी गुरू त्यांच्यातील शक्तिस्थाने ओळखून त्यांना घडवायचा. गायकांना, कलावंतांना सातत्याने गुरूचे मार्गदर्शन मिळायचे आणि सांगितीक वातावरणातच त्यांचा दिवस जायचा. त्यामुळे आपोआप संगीताचा, स्वरांचा संस्कार कलावंतांच्या मनावर व्हायचा. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी लागणारा संयम संपतो आहे. आत्म्यापर्यंत पोहोचणारे संगीत शिकण्यासाठी गुरू-शिष्य परंपरेचीच आवश्यकता असल्याचे मत सुप्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू युवा गायक राहुल देशपांडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. सप्तकच्या पं. सी.आर. व्यास संगीत महोत्सवात सादरीकरण करण्यासाठी आले असता त्यांच्याशी संवाद साधला. पूर्वी संगीत शिकताना गुरूकडे केवळ संगीताचीच साधना व्हायची. त्यावेळी मोठ्या गायकांची शैली आणि घराण्यांचे गायन ऐकण्याची सोय नव्हती. महत्प्रयासानेच या बाबी शक्य व्हायच्या. हल्ली टच स्क्रीनच्या काळात जगातल्या कुठल्याही गायकाचे गीत नव्या पिढीसमोर उपलब्ध आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संगीताची साधना करणाऱ्या गायकासाठी अनेक दिग्गज गायकांच्या शैली ऐकण्याची सोय उपलब्ध आहे. पण संगीत शिकण्यासाठी लागणारा संयमच आपण हरवून बसतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. सध्या शास्त्रीय संगीत म्हणजे काही विशिष्ट रसिकांसाठीच असल्यासारखे सादर होते आहे. कारण शास्त्रीय संगीताकडे लोक कमी प्रमाणात वळत आहेत. हे साधनेचे क्षेत्र आहे. आपले अभिजात भारतीय संगीतच खऱ्या अर्थाने शांतता, समाधान आणि आनंद देणारे आहे. त्यामुळे लोक कुठेही वळले तरी पुन्हा शास्त्रीय संगीताशिवाय पर्यायच नाही, असे राहुल यांनी सांगितले. माध्यमांच्या प्रसिद्धीमुळे शास्त्रीय गायन आणि कलावंतांना प्रसिद्धी मिळते, पण त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही अनुभव आहे. काही प्रमाणात राजाश्रय मिळत असल्यामुळे शास्त्रीय संगीताचा प्रसार होत असला तरी संगीताला लोकाश्रयाची जास्त गरज आहे. घराण्यांच्या गायकीचे शिक्षण घेणारे लोक कमी होत असल्याने संगीताच्या खोल तळाशी जाणारे लोकही कमी झाले आहे. भारतीय संगीताचा परिचय सुप्रसिद्ध सितारवादक पं. रविशंकर यांनी जगाला करून दिला. त्यांच्यामुळे भारतीय संगीताला जागतिक स्तरावर एक ओळख मिळाली. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून उस्ताद जाकीर हुसेन, शोभा गुर्टू, त्रिलोक गुर्टू विदेशात चांगले योगदान देत आहेत. -----