बंगळुरू : कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास लिमिटेडच्या कोप्पल येथील कार्यालयात कंत्राटी क्लार्क म्हणून काम केलेल्या कालकप्पा निदागुंडी याने तब्बल ३० कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याचा मासिक पगार फक्त १५ हजार रुपये होता. गेल्या दोन दशकांतील ही संपत्ती त्याने बेकायदेशीररीत्या मिळविल्याचा संशय आहे.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी निदागुंडीच्या प्रगतीनगरमधील घरावर छापा टाकून ही संपत्ती उघडकीस आणली. ही कारवाई कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास लिमिटेडमधील ७२ कोटी रुपयांच्या निधी अपहार प्रकरणाच्या चौकशीचा भाग होती. निदागुंडीला कामावरून काढले आहे.
छाप्यात काय आढळले?
२४ घरे, ६ भूखंड, ४० एकरांहून अधिक शेतजमीन, १ किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने, अनेक वाहने, आणखी बेकायदेशीर मालमत्तांचे दस्तऐवज.
कसा घातला गंडा?
अनेक गावांमध्ये विविध कामांसाठी मंजूर केलेल्या ९६ योजनांची बनावट कागदपत्रे तयार करून निधीचा अपहार करण्यात आला. यामध्ये तब्बल ६८ बनावट प्रकल्पांचा समावेश आहे.