सीआयडीने पाश आणखी आवळले

By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:52+5:302015-08-08T00:23:52+5:30

- कामत यांच्या जामीन अर्जावर 12 रोजी सुनावणी

CID gets more loophole | सीआयडीने पाश आणखी आवळले

सीआयडीने पाश आणखी आवळले

-
ामत यांच्या जामीन अर्जावर 12 रोजी सुनावणी
- कामत मुख्य संशयित

पणजी : माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्ण जामीन अर्जावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच या लाच प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आणि लाचेची रक्कम पुरविणारा दलाल तथा हवाला एजंट रायचंद सोनी याला गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) अटक केली आहे. त्याने पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या जबाबात दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांना लाच दिल्याची कबुली दिल्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढल्या अहेत.
लुईस बर्जर कंपनीकडून कामत व चर्चिल यांना मिळालेल्या कथित लाचेची रक्कम पुरविण्याचे काम सोनीने केले होते. तशी कबुली त्याने फौजदारी गुन्हेगार प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत नोंदविलेल्या जबाबात दिली आहे. जबाब नोंदविण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सोनी हा हवाला एजंट असून मोठमोठय़ा रकमेची देवाण-घेवाण करण्याचे काम तो करतो. पणजीत त्याचे कार्यालयही आहे. जैका प्रकल्पातील लाच प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो विदेशात पळाला होता. त्याला संपर्क करून गोव्यात आणण्यात क्राईम ब्रँचने यश मिळविले. त्याला अटक करण्यापूर्वी क्राईम ब्रँचने त्याच्या कार्यालयाची झडती घेतली होती. तसेच कार्यालयातील मुकेशा नामक कर्मचार्‍याचीही चौकशी करून जबाब नोंदवून घेतला होता.
दरम्यान, कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 12 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असून त्यांच्या जामिनाला हरकत घेताना क्राईम ब्रँचने आपले म्हणणे न्यायालयाला सादर केले. (प्रतिनिधी)

कामत ‘हेब्युचल ऑफेंडर’
दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना क्राईम ब्रँचकडून न्यायालायला सादर केलेल्या आापल्या 13 पानी स्पष्टीकरणात कामत यांना ‘हेब्युचल ऑफेंडर’ (गुन्हेगारी पार्श्वभूमीचा) असे म्हटले आहे. जैका लाच प्रकरणाव्यतिरिक्त त्यांच्यावर न्या. एम. बी. शहा आयोगाकडून खनिज घोटाळ्यात गुंतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच लोकलेखा समितीच्या अहवालातही त्यांच्यावर खाण घोटाळ्यात अडकल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचा उल्लेख क्राईम ब्रँचकडून करण्यात आला आहे.

वाचासुंदर यांच्याकडून कबुली जवाब
लाच प्रकरणात सर्वांत आधी अटक करण्यात आलेले ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांनी अखेर लाच प्रकरणाची कबुली दिली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेले वाचासुंदर यांनी शुक्रवारी सकाळी पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविला. त्यात कामत व चर्चिल यांना लाच देण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांनी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शविली आहे; परंतु त्याबाबत क्राईम ब्रँचकडून अद्याप निर्णय झालेला नाही.

‘त्या’ फाईलच्या प्रती मीडियाला
दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांचा शेरा असलेली आणि या प्रकरणातील लाचखोरीचा मोठा पुरावा ठरू शकणारी फाईल अद्याप क्राईम ब्रँचला मिळाली नाही. ती गायब होण्यामागे कामत यांचा हात असल्याचे क्राईम ब्रँचकडून म्हटले आहे. कारण कामत यांनी त्या फाईलच्या काही प्रती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविल्या आहेत, असा ठपका कामत यांच्या अटकपूर्व जामिनाला हरकत घेताना क्राईम ब्रँचने ठेवला आहे.

तपासासाठी सोशल मिडियाचा वापर
चर्चिल, कामत आणि वाचासुंदर यांना समन्स पाठवून चौकशी केली, तेव्हा सर्वांनीच लाच प्रकरणात भूमिका बजावलेल्या लुईस बर्जर कंपनीचे माजी अधिकारी संजय जिंदाल व शिवराम प्रसाद यांची नावे आणि पत्ता सांगण्याचे सांगण्याचे टाळले. आपण कोणाला ओळखत नाही, असेच सर्वांनी सांगितले; परंतु सोशल मीडियाच्या आधारे पोलिसांनी नावे व पत्ते शोधून काढले. तेथूनच या प्रकरणातील एक एक धागा जुळून येऊ लागला.

सोमवारी तिघांच्या जामिनावर सुनावणी
सोमवार दि. 9 रोजी विशेष न्यायालयात जैका प्रकरणातील तीन संशयितांच्या जामीन अर्जांवर सुनावणी होणार आहे. त्यात चर्चिल, वाचासुंदर आणि लुईस बर्जर कंपनीचा माजी उपाध्यक्ष सत्यकाम मोहंती यांचा समावेश आहे. तिन्ही अर्जांवर वेगवेगळ्या वेळी सुनावणी होणार आहे. त्यापैकी चर्चिल हे पोलीस कोठडीत आहेत, तर वाचासुंदर आणि मोहंती हे न्यायालयीन कोठडीत आहेत. मोहंतीला शुक्रवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.

यासाठी हवी कामत यांना अटक..
- समन्स बजावून केलेल्या तपासकामाला सहकार्य करीत नसल्याचा दावा.
- मोकळे राहिल्यास ते साक्षीदारांना धमकवतील, पुरावे नष्ट करतील, अशी भीती.
- त्यांनी 1.20 कोटी रुपये लाच घेतल्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा.
- कामत यांचा शेरा असलेली व गायब झालेली फाईल मिळविण्यासाठी.

Web Title: CID gets more loophole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.