चर्चवरील हल्ले; पंतप्रधान गप्प का?
By Admin | Updated: February 6, 2015 02:20 IST2015-02-06T02:20:54+5:302015-02-06T02:20:54+5:30
दिल्लीतील चर्चवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाचे शेकडो लोक आज गुरुवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले़

चर्चवरील हल्ले; पंतप्रधान गप्प का?
नवी दिल्ली : दिल्लीतील चर्चवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ख्रिश्चन समुदायाचे शेकडो लोक आज गुरुवारी दिल्लीच्या रस्त्यावर उतरले़ राजधानीतील चर्चवर एकापाठोपाठ एक असे हल्ले होत असताना पंतप्रधान या मुद्यावर गप्प का? असा सवाल या निदर्शकांनी यावेळी केला़
गेल्या नोव्हेंबरपासून नवी दिल्लीतील पाच चर्चवर अज्ञातांकडून हल्ले झाले आहेत. अलीकडे दक्षिण दिल्लीस्थित वसंतकुंज भागातील एका चर्चमध्ये अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती़ यामुळे ख्रिश्चन समुदायात संतापाचे वातावरण आहे़ चर्चवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मध्य दिल्लीच्या सेक्रेड हार्ट कॅथेड्रलसमोर ख्रिश्चन समुदायाच्या लोकांनी सकाळी ९.३० च्या सुमारास निदर्शने केली़
चर्चवरील हल्ले थांबवा, आम्हाला न्याय द्या, अशी घोषणाबाजी निदर्शकांनी चालवली होती़ यादरम्यान काही निदर्शकांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र यावेळी तैनात पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले़ चर्चबाहेर निदर्शने करण्याची परवानगी त्यांनी घेतली नव्हती़ सार्वजनिक रस्त्यांवर त्यांना निदर्शने करू दिली जाणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले़
(लोकमत न्यूज नेटवर्क)