गोव्यात शांतादुर्गेच्या छत्र्या घेऊन नाचतात ‘ख्रिस्ती’
By Admin | Updated: March 7, 2015 01:15 IST2015-03-07T01:15:53+5:302015-03-07T01:15:53+5:30
घर वापसी, मदर तेरेसांबाबत अनुद्गार अशा घटनांमुळे देश धार्मिक विद्वेषाने ढवळलेला असताना पणजीपासून ४0 किलोमीटरवर कुंकळ्ळीत मात्र या गढूळ वातावरणाची झळही पोहोचलेली नाही.

गोव्यात शांतादुर्गेच्या छत्र्या घेऊन नाचतात ‘ख्रिस्ती’
सुशांत कुंकळयेकर - मडगाव
घर वापसी, मदर तेरेसांबाबत अनुद्गार अशा घटनांमुळे देश धार्मिक विद्वेषाने ढवळलेला असताना पणजीपासून ४0 किलोमीटरवर कुंकळ्ळीत मात्र या गढूळ वातावरणाची झळही पोहोचलेली नाही. येथे हिंदू व ख्रिस्ती लोकांनी एकत्र येऊन शिगमा साजरा केला. आणखी तीन दिवसांनी म्हणजे बुधवारी होणाऱ्या देवी शांतादुर्गेच्या छत्रोत्सवाची उत्सुकता या गावातील हिंदूंएवढीच ख्रिश्चन लोकांनाही लागून राहिलेली आहे.
कुंकळ्ळीची देवी शांतादुर्गा म्हणजे सायबिणीचीच (मदर मेरीची) बहीण, अशी भावना ख्रिस्ती लोकांमध्ये आहे. कुंकळ्ळीची साऊद सायबीण (अवर लेडी आॅफ हेल्थ) ही फातर्पेच्या शांतादुर्गेची खास बहीण अशी भावना हिंदूंमध्ये आहे. छत्रोत्सवाची खासीयत म्हणजे हिंदूंप्रमाणेच ख्रिस्ती लोकही यात सहभागी होतात. देवीच्या छत्र्या घेऊन हे ख्रिस्ती लोक आनंदाने बेधुंद होऊन नाचतात. (प्रतिनिधी)
‘ते’ आपले मूळ विसरले नाहीत
या उत्सवामागील भावना अशी की, १६व्या शतकात पोर्तुगिजांनी जो हिंदू देवळांचा विध्वंस केला त्याची सर्वात अधिक झळ सासष्टी तालुक्याला बसली. शांतादुर्गेचे देऊळ १५८३ साली पोर्तुगिजांनी तोडून त्या जागी अवर लेडी आॅफ हेल्थ (साऊद सायबीण)चे चर्च उभारले. या वेळी स्थानिकांनी देवी शांतादुर्गा या जागेतून जवळच असलेल्या फातर्पे गावात हलवली. त्या वेळी फातर्पे हा गाव सौंदेकरांच्या राजवटीखाली होता. यामुळे पोर्तुगिजांची सत्ता तेथे चालत नसे. या वेळी कित्येक हिंदूंना पोर्तुगिजांनी धर्मांतरित केले. मात्र, हे धर्मांतरित अजूनही आपली मुळे विसरलेले नाहीत. कुंकळ्ळीतील छत्रोत्सव त्याचेच उदाहरण आहे.