चिटफंड घोटाळा खासदाराला भोवला
By Admin | Updated: November 5, 2014 04:49 IST2014-11-05T04:49:16+5:302014-11-05T04:49:16+5:30
कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात बिजदचे मयूरगंज येथील खासदार रामचंद्र हंसदा आणि माजी आमदारद्वय सुवर्ण नायक व हितेशकुमार बागरती यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली

चिटफंड घोटाळा खासदाराला भोवला
भुवनेश्वर : कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात बिजदचे मयूरगंज येथील खासदार रामचंद्र हंसदा आणि माजी आमदारद्वय सुवर्ण नायक व हितेशकुमार बागरती यांना मंगळवारी सीबीआयने अटक केली. प. बंगालमधील शारदा चिटफंडापाठोपाठ ओडिशात उघडकीस आलेल्या नबादीगांता चिटफंड घोटाळ््याने नबीन पटनायक यांच्या सरकारची कोंडी झाली आहे. खा. हंसदा यांच्या अटकेमुळे ओडिशातील सत्तारूढ बिजदला मोठा हादरा बसला आहे, तर अटक झालेल्यांमध्ये बागरती या भाजपाच्या माजी आमदाराचा समावेश असल्याने भाजपाही अडचणीत आली आहे.
गुन्हेगारी कट, फसवणूक आणि निधी अन्यत्र वळविण्याच्या आरोपाखाली या तिघांनाही सीबीआयच्या विशेष तपास पथकाने अटक केली आहे, अशी माहिती सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हंसदा, नायक आणि बागरती हे तिघेही ओडिशातील नबादीगांता कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड या चिटफंड कंपनीचे माजी संचालक आहेत.
हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एकूण ४४ चिटफंड कंपन्यांच्या कारभाराचा सीबीआयतर्फे तपास सुरू आहे.
खा. हंसदा, नायक आणि बागरती या तिघांना सीबीआय कार्यालयात चौकशीकरिता बोलावण्यात आले
आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यासंदर्भात आणखी काही नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे. २६ आॅक्टोबर रोजी सीबीआयने नबादीगांताचा सीएमडी अंजन बलियारसिंग आणि कार्तिक परिदा व प्रदीप पटनायक या दोन संचालकांना अटक केली होती. (वृत्तसंस्था)