पित्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडली चिमुरडी!
By Admin | Updated: March 2, 2016 02:21 IST2016-03-02T02:21:46+5:302016-03-02T02:21:46+5:30

पित्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडली चिमुरडी!
>औरंगाबाद : घाईगर्दीत घराबाहेर निघालेल्या एका पित्याच्या ट्रॅक्टरखाली त्याची चिमुरडी मुलगी आल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना राजनगरमध्ये मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. हिरकणा योगेश जाधव (४) असे या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. योगेश जाधव हे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करतात. महापालिकेच्या पॉइंटवरून ट्रॅक्टरला जोडलेले पाण्याचे टँकर भरून आणायचे काम त्यांच्याकडे असते. मंगळवारी सकाळी ते पाण्याने भरलेला टँकर घरी घेऊन आले. जेवण करून ते पुन्हा टँकर घेऊन जाणार होते. जेवण झाल्याबरोबर त्यांना फोन आला. त्यामुळे ते तात्काळ घाईत निघाले. पण लाडकी लेक हिरकणा त्यांच्या पाठीमागे लागली. तिला घेऊन जाणे शक्य नव्हते, म्हणून त्यांनी तिला घरात नेऊन सोडले. आता ती येणार नाही, असे समजून त्यांनी घाईतच ट्रॅक्टर सुरू केला. मात्र हिरकणा त्यांच्या पाठीमागे येऊन उभी राहिली होती. योगेश यांनी जसा ट्रॅक्टर मागे घेतला, तशी हिरकणा चाकाखाली चिरडली गेली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)